फुले मार्केटमधील दोन दुकान फोडण्याचा प्रयत्न

0

जळगाव : शहरातील फुले मार्केट मधील वाधवाणी क्लॉथ स्टाअर्स व ओम हॅन्डलुम हॉऊस हे दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी वाधवाणी क्लॉथ या दुकानाचे कुलूप तोडण्यात अपयश आल्याने त्यांनी चक्क दुकानाचे लाकडी दरवाजा आग लावून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तसेच याप्रकरणी दुकानमालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

दरवाज्याला लावली आग
सिंधी कॉलनी येथील रहिवासी सुरेश अर्जुनदास वाधवाणी यांचे फुले मार्केटमधील पहिल्या माळ्यावर वाधवाणी क्लॉथ असे कापड दुकान आहे. वाधवाणी यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री 9 वाजता दुकान बंदे करून घरी गेले. बुधवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या दरवाज्याचे कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतू कडी-कोयंडा तोडता न आल्याने त्यांनी चक्क दुकानाच्या दरवाज्याला आग लावली. मात्र, चोरट्यांना दुकानात प्रवेश करण्यात अपयश आले. गुरूवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास वाधवाणी यांचे भाऊ मुकेश यांना मार्केटमधील वॉचमनचा फोन आला. त्याने दुकानाला आग लागल्याचे सांगितले. मुकेश यांनी लागलीच दुकानाकडे धाव घेतली असता वॉचमन हा दुकानाच्या दरवाज्याला लागलेली आग विझवितांना दिसला. यानंतर मुकेश यांनी लागलीच दुकानाचे दार उघडून आत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही वस्तुंना आग लागल्याचे दिसून आले नाही.

समोरील दुकानही फोडण्याचा प्रयत्न
सुरेश वाधवाणी यांच्या दुकानासमोर अशोक जवाहरलाल कुकरेजा यांचे ओम हॅन्डलुम हॉऊस दुकान आहे. या दुकानाचेही चोरट्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले. दरम्यान, दोन्ही दुकानांचे कुलूप तोडण्याच चोरट्यांना अपयश आले असल्याने दुकानातील एकही वस्तु चोरीला गेलेली नाही. गुरूवारी सकाळी सुरेश वाधवाणी यांनी काही दुकानधारकांसह शहर पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी तक्रार दाखल केला. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीत चोरटे कैद
फुले मार्केटमधील वाधवाणी क्लॉथ व ओम हॅन्डलुम दुकान रात्री 2 वाजता दोन अज्ञात इसम फोडण्याचा प्रयत्न करीत असतांना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. तसेच चोरट्यांच्या हातात टॅमी असून कुलूप तोडता येत नसल्याने त्यांनी दरवाज्याला आग लावून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असतांना सीसीटीव्हीत दिसले. दरम्यान, चोरटे रात्री 2 वाजेपासून तर पहाटे 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी फिरतांना दिसत आहेत. यातच सकाळी सीसीटीव्हीत फुटेज सुरेश वाधवाणी यांनी घेतल्यानंतर शहर पोलीसांना दिले आहे. शहर पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी देखील केली.