फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांमध्ये मुंबई व पुण्याने मारली बाजी

0

शिरपूर । आ र.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या भव्य मैदानावर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) अंतर्गत आंतर जिल्हा फुटबॉल चॅम्पिअनशिप सब-ज्युनिअर गर्ल्स,14 वर्षे खालील मुलींच्याफुटबॉलच्या सामन्यांमध्ये दि. 17रोजी झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यांमध्ये मुंबई व पुणे संघाने विजय संपादन करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. दि. 18 रोजी अतिशय दिमाखदार स्वरुपात स्पर्धेचा समारोप होणार आहे.

सामने ड्रॉ पदधतीने
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) अंतर्गत आंतर जिल्हा फुटबॉल सामन्यांच्या आयोजनासाठी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष माजी आ. राजवर्धन कदमबांडे, शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे मानद सचिव व स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य रईस काझी, प्रितेश पटेल, तपन घोष, भूषण पांगेकर, पदाधिकारी परीश्रम घेत आहेत. सामने ड्रॉ पदधतीने खेळविण्यात आले. क्रीडा शिक्षिका एस.एस.जोशी, दुष्यंत पाटील, ज्योत्स्ना जाधव, मनिषा पाटील, राकेश बोरसे, फुटबॉल कोच शफीक मोहंमद शेख, अयाज अहमद, विविध खेळांचे सर्व कोच हे परीश्रम घेत आहेत.

मुंबई संघाचे तब्बल 6 गोल
उपांत्य फेरीतील पहिला सामना मुंबई संघ व कोल्हापूर संघ यांच्यात झाला. मुंबई संघाने तब्बल 6 गोल केले. कोल्हापूर संघाला फक्त एकच गोल करता आला. मुंबई संघाने 6 विरुदध 1 असा सामना जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. मुंबई संघाकडून सर्वाधिक 3 गोल जान्हवी शेट्टी हिने केले. त्यापाठोपाठ अनाघा जानकीरामन हिने 2 गोल केले तर डेनिस पेरीराहिने 1 गोल केला. तसेच कोल्हापूर संघाकडून एकमेव गोल रम्याश्री शांतीप्रसाद हिने केला.

पुणे संघाचे 2 गोल
उपांत्य फेरीतील दुसरा सामना पुणे व नागपूर या संघांमध्ये झाला. यात पुणे संघाने चुरशीच्या खेळाचे प्रदर्शन करुन 2 गोल केले. उर्वी साळुंके व अनुष्का सहाई यांनी प्रत्येकी 1 गोल केला. विरोधात नागपूर संघाला एकही गोल करता आला नाही. या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एच.आर.पटेल फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.बी.बारी, आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजचे प्रा.डॉ.अनिल टाटीया, फुटबॉल संघ जिल्हा मानद सचिव रईस काझी उपस्थित होते.