फुकटचा पगार लाटतात, कर्तव्याची लाज राखा

0

भुसावळ : इतर जिल्ह्यांमध्ये सातबारा संगणीकरण व महसुल वसुलीच्या बाबतीत जोरदार काम सुरु आहे. मात्र आपल्याच भागात काम दिसून येत नाही. तुम्ही फक्त आंदोलन करा काम करु नका, राज्यात कुठल्याही जिल्हाधिकार्‍याने तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करुन दिले नाही. मात्र मी या सर्व सुविधांसाठी शासनाचा लाखो रुपयांचा पैसा खर्च केला तरी देखील तलाठी काम करायला तयार होत नाही. उठसुट केवळ आंदोलन केली जातात, शासनाचा फुकटचा पगार लाटला जातो किमान आपल्या कर्तव्याची तरी लाज राखून काम करा अशा कठोर शब्दात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंडळाधिकारी व तलाठ्यांची कानउघाडणी केली.
येथील आयएमए सभागृहात भुसावळ विभागातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यातील महसूल वसुली व सात बारा संगणीकरणासंदर्भात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

तलाठी व मंडळाधिकार्‍यांकडून कामाचा आढावा
यावेळी या तीनही तालुक्यातील सर्वाधिक कमी असलेली महसूल वसुली व सात बारा नोंदी न झाल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी मंडळाधिकार्‍यांसह तलाठ्यांना चांगलेच धारेवर धरले. मंचावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांसह महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे, एनआयसी निरीक्षक बोरोले, भुसावळ तहसिलदार मिनाक्षी राठोड, मुक्ताईनगर तहसिलदार जितेंद्र कुंवर, बोदवड तहसिलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी तलाठी व मंडळाधिकार्‍यांकडून कामाचा आढावा जाणून घेण्यात आला.

बांधकामाची तपासणी करा
भुसावळ विभागातून सर्वाधिक कमी वसुली व सातबारा संगणकीकरणाच्या नोंदी न झाल्यामुळे येथील तलाठी संघटनेचे अध्यक्ष एन.आर. ठाकूर यांना धारेवर धरले व तुम्हीच जर कामात सक्षम नसाल तर इतर जण तुमच्यापासून काय आदर्श घेतील असे सांगत उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांनी ठाकूर यांची कानउघाडणी केली. तसेच वसुलीसंदर्भात हार्वेस्टर, क्रशरची संख्या वाढली मात्र वसुली का होत नाही. त्यांच्यावर कारवाई करा प्लॉटधारक वसुली करीत नसतील तर त्यांना नोटीस बजवा, जाहिरात किंवा बातमीच्या माध्यमातून त्यांना सुचित करा, तसेच वाळू महसूल वसुली संदर्भात आपापल्या भागात कुठे बांधकाम चालू असेल त्याठिकाणी जाऊन घरमालकाकडून पावती पाहून तपासणी करा अशा प्रकारे नियोजन करुन काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी दिल्या.

तहसिलदार थोरात यांना धरले धारेवर
यावेळी भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड विभागातील महसुल वसुलीचा आढावा घेण्यात आला मात्र वसुली समाधानकारक नसल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी बोदवड येथील तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना चांगलेच धारेवर धरले बोदवड तालुक्यात सर्वाधिक कमी 30 हजार सात बारा संगणीकृत नोंदणीचे उद्दीष्ठ आहे. तरी देखील हजाराच्यावर येथे नोंदी झालेल्या नाहीत. यासंदर्भात तुम्ही तलाठी व मंडळअधिकार्‍यांना विचारणा करीत नाही असे असे विचारुन थोरात यांची कानउघाडणी केली.

नेटसाठी 28 लाख खर्च
सात बारा संगणीकरणाच्या नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला मात्र केवळ सर्व्हरमध्ये खराबी येत असल्याच्या तक्रारी केल्या जातात. काम करण्याची इच्छा असल्यास कुठल्याही परिस्थितीत काम होऊ शकते. इंटरनेटसाठी बीएसएनएलला 28 लाख रुपये भरले, लॅपटॉप, प्रिंटर उपलब्ध करुन दिले तरी काम होत नसल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी संताप व्यक्त केला. भुसावळ तालुक्यात 3 हजार, बोदवड 750, मुक्ताईनगर 1 हजार एवढी नोंदणी झाली असून भुसावळ विभाग सर्वात खाली असल्याचे दिसून येते.

‘जनशक्ति’च्या वृत्ताची दखल
भुसावळ शहरात काही ठिकाणी 2 हजार 25 ब्रास वाळू जमा करण्यात आली असून याबाबत दै. जनशक्तीने वृत्तांकन करुन या वाळूच्या साठ्यावर झाडे झुडपे वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत शासनाची लाखो रुपयांची वाळू मातीमोल होत असल्याचे उजेडात आणले होते. त्यानंतर आजच्या आढावा बैठकीत एन.आर. ठाकूर यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांना माहिती देण्यात आली असता तिचा लिलाव का केला जात नाही अशी विचारणा केल्यानंतर प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार नाफडे यांनी लिलावाची परवानगी मागितली आहे. मात्र अजूनही परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच तलाठ्यांनी आपापल्या भागात जाऊन बांधकामाची तपासणी करा, घरमालकांकडून वाळू खरेदीच्या पावत्या पहा, अधिकृत पावत्या न मिळाल्यास तेथील घराचे बांधकाम लागलीच बंद करण्यात येण्याच्या सुचना दिल्या. गेल्या वर्षी भुसावळ विभागाची वसुली 90 टक्के होती ती आता 30 टक्केच आहे. त्यामुळे कामगिरी बजवा अन्यथा कारवाई करुन घरी पाठविणार अशा सुचना उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांनी केल्या.