Private Advt

फायनान्स कंपनीच्या क्रेडीट मॅनेजरची कामाच्या तणावातून आत्महत्या

कमी मनुष्यबळामुळे वाढला ताण

जळगाव । मयूर कॉलनीतील रहिवासी व एका फायनान्स कंपनीत क्रेडीट मॅनेजर पदावरील एका अधिकार्‍याने वाढत्या कामाच्या तणावातून सोमवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानी सुसाइड नोट लिहिली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.

प्रदीप धनलाल कापुरे (वय 45) हे मुथ्थूट होमफिन इंडिया लिमिटेडमध्ये 1 नोव्हेंबर 2017 पासून क्रेडीट मॅनेजर पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे मागील काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातीलही कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली. या कामाचा व्याप वाढल्याने तणाव निर्माण झाला. हा ताण असह्य झाल्याने त्यांनी सोमवारी सकाळी 6 वाजेच्या पूर्वी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी सुचिता कापुरे या सकाळी 6 वाजता मागच्या घरात गेल्या. तेव्हा त्यांना पतीने आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांनी पतीचा मृतदेह बघून आक्रोश केला. शेजारी व नातेवाईकांनी मृतदेह उतरवून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात घेऊन गेले. कापुरे यांनी कंपनीच्या वाढीव कामकाजाच्या ताणतणावातून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुचिता कापुरे, मुलगा कुणाल कापुरे, मुलगी यज्ञा कापुरे, आई सुमनबाई कापुरे व बहिण रेखा शिंपी असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

कमी मनुष्यबळामुळे वाढला ताण

प्रदीप कापुरे यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. यात म्हटले आहे की, जळगाव, धुळे जिल्ह्यातील मुथ्थूट होमफीन कंपनीत क्रेडीट मॅनेजर पदावर नोकरीला असताना ग्राहकांच्या समस्या, जुने प्रकरणे, नवीन प्रकरणे, त्यांच्या प्रकरणातील येणार्‍या त्रुटी, ऑनलाइन वर्क, वसुली आदींसह सर्व कामे पाहत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कामाची सुद्धा जबाबदारी आल्यामुळे कामाचा ताण अधिक वाढत आहे. त्यामुळे हा ताण सहन होत नाही. त्यात मनुष्यबळ कमी व काम जास्त, अशी अवस्था झाली. त्यामुळे आत्महत्या करीत आहे. माझ्या पश्चात वारस म्हणून सर्व योजनांचा लाभ पत्नीला मिळावा, यासाठी कंपनीतील अधिकारी व सहकार्‍यांंनी देखील सहकार्य करावे, अशी अपेक्षा प्रदीप कापुरे यांनी सुसाइड नोटमधून व्यक्त केली आहे.