‘फायटर’ हर्षा!

0

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची पाटी कोरीच राहणार असे वाटत असताना बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूने रौप्य आणि कुस्तीमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकून देशाची पत राखली होती. दोघा मुलींनी देशाला पदके जिंकून दिल्यामुळे स्त्रीशक्तीचे कौतुक अनेक मेसेजेस त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण याच मुली जेव्हा प्राथमिक पातळीवर खेळायला सुरुवात करतात आणि घरून जर पाठिंबा मिळत नसेल तर काय? त्या मुलीनंतर खेळाच्या मैदानावर दिसतात का? या प्रश्‍नाचे उत्तर नाहीच असे मिळेल. कारण खेळण्यासाठी घरच्या लोकांविरुद्ध बंड करण्याचे धाडस करणार्‍या फार कमी मुली असतात. अशीच एक मुलगी सध्या मुंबईतील राजे शहाजी क्रीडा संकुलात स्लम सॉकरतर्फे दारिद्ˆयरेषेखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संघासाठी गोलरक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. विदर्भकडून खेळताना राष्ट्रीय संघाचा दरवाजा ठोठावणारी हर्षा रघताते ही ती मुलगी.

विदर्भातील वर्धा जिल्ह्यात असलेल्या हिंगणघाटमधील हर्षाची कहाणीच वेगळी. हर्षाचे वडील हमालीचे काम करणारे. ट्रकमधील गोणी उतरावयाचे, चढवायचे काम ते करतात. त्यात त्यांना दारूचेही व्यसन. त्यामुळे फुटबॉल खेळण्याची आवड जोपासणार्‍या हर्षाला खेळण्यासाठी त्यांचा कायम विरोध. हर्षाने खेळू नये म्हणून तिला केवळ शिवीगाळच नाही तर मारहाणही नित्याचीच. त्यामुळे त्यांनी 16 वर्षांच्या हर्षापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या माणसाशी तिचे लग्नही ठरवले होते. पण हर्षानेच केवळ फुटबॉलवरील प्रेमापोटी बंडाचे निशाण फडकवत स्वत:चा होऊ घातलेला बालविवाह मोडीत काढला. हर्षाचा हा प्रवास अगदी जवळून पाहिला तो तिचे प्रशिक्षक मुस्ताफा बक्ष यांनी. बक्ष ही हर्षाच्या गावातील आहेत. हर्षा शाळेत असताना बक्ष यांनी तिला खेळण्याची पहिली संधी दिली. हर्षाचे धावणे आणि तिचा स्टॅमिना बघून बक्ष खूपच प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी तिला फुटबॉल खेळाचे धडे देण्यास सुरुवात केली. आपल्या पोरीला खेळायला शिकवणारा हाच तो म्हणून हर्षाच्या पालकांनी बक्षला ही अनेकवेळा शिवीगाळ केली, धमकावलेही. त्यामुळे बालविवाह ठरताच हर्षाने मदतीसाठी पहिली धाव घेतली ती बक्ष यांच्याकडेच. हर्षा घर सोडून थेट बक्ष यांच्या घरीच राहायला निघून गेली. बक्ष यांच्या घरी गेल्यावर मनोधैर्य खचल्यामुळे हर्षाने आत्महत्येचाही अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर वादविवाद, भांडण होऊन अखेरीस एवढ्यात लग्न न करण्याच्या अटीवर हर्षा घरी परतली.

स्पर्धेसाठी मुंबईत आलेल्या हर्षाला जेवणात भाजी चपाती डाळ भात असे पूर्ण जेवण मिळाले. पण अजून एक भाऊ आणि बहीण असलेल्या हर्षाच्या घरी फक्त दिवाळी, होळी अशा सणांच्याच दिवशी भाजी बनते. एरवी फक्त डाळ आणि भात जेवायचा. पत्र्यांचे घर, कधी पाणी नाही कधी वीज. पावसाळ्यात तर विचारायची सोय नाही. अशा विषम परिस्थितीतही हर्षाने आपली फुटबॉलची आवड नुसतीच जोपासली नाही, तर भारतासाठी खेळण्याचे ध्येयही तिने डोळ्यासमोर ठेवले आहे. मुंबईत होत असलेल्या या स्पर्धेतून नॉर्वेतील ऑस्लेमध्ये 29 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान होणार्‍या बेघर मुलांच्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यात येणार आहे. भारतासाठी खेळण्याची जबरदस्त महत्त्वकांक्षा बाळगणार्‍या हर्षाने फुटबॉल स्पर्धेसाठी मुंबईला जात आहे हे घरी सांगितलेच नव्हते. मुंबईत आल्यावर तिने येथे स्पर्धा खेळण्यासाठी आल्याचे घरी कळवले. स्पर्धेनंतर घरी गेल्यावर काय होणार याचा अंदाज हर्षाला आहे. त्यामुळे सध्यातरी त्याची काळजी न करता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी जोशपूर्ण खेळ करायचा असल्याचे हर्षाने सांगितले.

स्लम सॉकरच्या फुटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या केवळ हर्षाचीच ही कहाणी नाही. स्पर्धेत महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, आसाम, तामीळनाडू आणि देशातील इतर राज्यांतून या स्पर्धेत खेळण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची थोड्याफार फरकाने हर्षासारखीच कहाणी आहे. हर्षाच्या पालकांप्रमाणे विकास मेश्रामचे पालकही दारूच्या आहारी गेलेले. इतकंच नाही स्वत: विकासलाही दारू आणि तंबाखूचा भयंकर नाद होता. नागपूरच्या रस्त्यावर दारुण अवस्थेत, चालायची शुद्ध नसलेल्या विकासमधील गुणवत्ता स्लमसॉकरच्या फुटबॉल प्रशिक्षकांनी हेरली. विकासचा तो काळ आता इतिहास जमा झालाय. विकास या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतोय ते भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठीच. खरंतर समाजाच्या दृष्टीने हर्षा आणि विकास हे दोघेही तसे फार मोठे नाही. पण बेघर आणि द्रारिद्ˆयरेषेखालील मुलांना फुटबॉलच्या माध्यमातून जग दाखवणार्‍या स्लमसॉकरसाठी मात्र हे दोघेच नाही, तर अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी झुंजणार्‍या प्रत्येकासाठी स्लमसॉकरला खूप काही करून दाखवायचे आहे. स्लम सॉकरचा संस्थापक विजय बारसेने त्यासाठी फुटबॉल खेळाची थेरेपी वापरात आणली. खेळाच्या माध्यमातून हर्षा, विकाससारख्या अनेक मुलामुलींना जगण्यासाठी आशेचा किरण दाखवायचा असल्याचे बारसे याने सांगितले.

-विशाल मोरेकर