फलकावर शाई फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करा

0

धुळे: तेली समाजाच्या आराध्यदैवताच्या फलकावर शाई फेकल्याने अमळनेरात तणाव निर्माण झाला असून या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हा फलक अमळनेरातील श्री संताजी नगरात होता. कुठल्यातरी माथेफिरुने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. घटनेच्या निषेधार्थ माजी महापौर भगवान करनकाळ यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, श्री संत संताजी जगनाडे महाराज हे तेली समाजाचे आराध्य दैवत आहे. अज्ञात माथेफिरुने अमळनेर येथील श्री संताजी नगरामधील बोर्डावरील श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्रावर शाई फेकून धार्मिक भावना दुखाविण्याचा प्रकार केला.

सदर बाब निदर्शनास आल्यानंतर काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण होते. यावेळी तेली समाज बांधवांतर्फे संतप्त भावना व्यक्त केल्या. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी धुळे जिल्हा तिळवण तेली समाज जिल्हाध्यक्ष भगवान करनकाळ, सेक्रेटरी युवराज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकार्‍यांना अशा समाजकंटकांवर वचक बसण्यासाठी कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर अध्यक्षा सुमन महाले, महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव,शोभना बागूल, रेखा थोरात, मनिषा चौधरी, सचिव विजया चौधरी, रुपाली महाले, भारती अहिरराव,नगरसेविकाकल्पना बोरसे, कल्पना चौधरी, विमल चौधरी, ज्योती चौधरी, गीता चौधरी, आशा चौधरी आदींसह शंभर जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत.