फरार आरोपींची प्रॉपर्टी होणार जप्त

0

मुंबई । डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. हत्या प्रकरणातील जे आरोपी फरार आहेत. त्या आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याची कारवाई सुरू झाली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला साडेतीन वर्षे, तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे झाली आहेत. या प्रकरणातील आरोपी मोकाट असून त्यांना कधी पकडण्यात येईल, असा प्रश्‍न विद्या चव्हाण यांच्यासह अनेक सदस्यांनी विचारला होता. त्यावर बोलताना केसरकरांनी सांगितले की, दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणाचा तपास 2014 पासून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या गुन्ह्यातील आरोपी समीर गायकवाड व वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे यांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. यातील दोन आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत. यापूर्वीच आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावून त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आल्याचेही केसरकर यांनी सांगितले. सनातन संस्थेवरही बंदी घालण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली असता त्यावर बोलताना केसरकर यांनी यासंदर्भातचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नीलम गोर्‍हे, जयंत पाटील यांनीही याविषयी मत मांडली.