फडणवीसांची अटक मुंडेंनी टाळली!

0

मुंबई । मुंबई महापालिकेत घोटाळा झालेला नाही याचा उल्लेख एसआयटीच्या अहवालात आहे. घोटाळ्यांच्या चौकशीत क्लीन चिट देण्यात आल्याचे शिवसेना आमदार अनिल परब यांनी नमूद केले. याउलट नागपूर महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी नंदलाल समितीच्या चौकशी अहवालात तत्कालीन महापौर आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते. देवेंद्र फडणवीस यांना अटक होऊ नये म्हणून गोपीनाथ मुंडेंनी गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रयत्न केल्याची ऐकीव माहिती होती, असा गौप्यस्फोटही अनिल परब यांनी केला. वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत अनिल परब बोलत होते.

चव्हाण बोलले म्हणून पाठिंबा काढणार नाही – अनिल परब
भाजपचा पाठिंबा मिळो न मिळो महापौर मात्र आमचाच

शिवसेनेने राज्याच्या सत्तेतून पाठिंबा काढल्यास काँग्रेस समर्थनाचा विचार करेल, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले होते. परंतु, अशोक चव्हाण बोलले म्हणून आम्ही सत्तेतून पाठिंबा काढणार नाही. काँग्रेसकडून कोणीही पाठिंबा मागितला नाही. शिवाय त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे शिवसेना आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला दगाफटक्याची चिंता नाही. मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार, असा विश्‍वासही परब यांनी व्यक्त केला. महापौर निवडीत जो आमच्यासाठी हात वर करेल, तो आमचा मित्र असेल.

जिद्दीच्या जोरावरच शिवसेनेचे यश

भाजपने पाठिंबा दिला तरी आमचा महापौर असेल आणि पाठिंबा दिला नाही, तरीही महापौर आमचाच असेल, असे अनिल परब म्हणाले. युती तुटल्यामुळे शिवसैनिक एकजूट झाले. त्यांना आपले सामर्थ्य समजले. पैसे नव्हते, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार प्रचारक नव्हता. फक्त जिद्दीच्या जोरावर शिवसेनेने मिळवलेले यश समाधानकारक असल्याचे परब यांनी सांगितले. मात्र, भाजपने सत्तेच्या जोरावर यश मिळवल्याचा पुनरुच्चार परब यांनी केला. मुंबई महापालिकेत शिवसेनेला 84 जागा, तर भाजपला 82 जागा मिळाल्यानंतर सत्ता कोण स्थापन करणार याची चर्चा रंगली आहे.

पोलिसांच्या मदतीने शिवसेना उमेदवारांना धमक्या

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने सत्तेचा गैरवापर केला. पोलिसांच्या मदतीने शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या. परंतु, पैसे वाटणार्‍या भाजप उमेदवाराला मात्र सोडले, असा सनसनाटी आरोप अनिल परब यांनी केला. शिवाय मुंबईतील भाजपच्या यशाचं श्रेय सत्तेला आहे. भाजपची ताकद वाढलीय, पण शिवसेनेपेक्षा नाही, असेही ते म्हणाले.