प्लॉट विक्रीत फसवणूक ; साकेगावच्या पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

0

भुसावळ- प्लॉट नावावर नसताना डमी महिला उभी करून प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी साकेगावातील पाच ठगांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

महिलेच्या प्लॉटची परस्पर केली विक्री
पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी सीमा विकास सोनवणे (वरसे, ता.रोहा, जि.रायगड) यांचा सर्वे नंबर 269/1 अ, ब, क मधील अकृषिक प्लॉट नंबर 54 मधील 185.80 मीटर चौरस प्लॉट 9 जानेवारी 2001 ते वेळ व तारीख नक्की दरम्यान आरोपींनी संगनमत करून विकला. सीमा सोनवणे यांच्या जागी संगीता सोनवणे यांना डमी म्हणून उभे करण्यात आले तसेच बनावट स्वाक्षरी व पुरावे तयार करण्यात आले. या प्रकरणी संशयीत आरोपी राकेश नथ्थू सोनवणे (45), संगीता विकास सोनवणे (45), ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास शांताराम धनगर (42), ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिपाई अशोक काशीनाथ कोळी (40), साकेगावातील नरेंद्र इलेक्ट्रॉनिक्स संचालक नरेंद्र एकनाथ भोळे (50) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. आरोपींना 9 रोजी तालुका पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी तपासात प्लॉट खरेदी-विक्री संदर्भातील सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश वैद्य करीत आहेत.

भुसावळ तालुक्यात रॅकेट कार्यरत
दुसर्‍याच्या नावावरील प्लॉट-खरेदी विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता असून पोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Copy