प्रेरणा वाचन अभियानांतर्गत शिक्षकांचा अभ्यास दौरा

0

जळगाव : दीपस्तंभ फाऊंडेशनच्या आत्मविश्वास वाचन प्रेरणा अभियान या उपक्रमांतर्गत 2015 मध्ये झालेल्या अभियानात 3500 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यातून घेतलेल्या परीक्षेतून उत्तीर्ण पहिल्या 40 प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. त्या शिक्षकांचा अभ्यास दौरा अर्थात सहल नुकातील पुणे व बारामती परिसरातील शैक्षणिक संकुल तसेच शिक्षणतज्ञांशी भेटी देऊन पूर्ण झाला. या अभियानात सहभागी शिक्षकांची शाळाभेट, मुलं शिकतात कशी?, एकत्रित विचार करूया या पुस्तकांच्या आधारे परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून पहिल्या ४० शिक्षकांची निवड सदर दौऱ्यासाठी करण्यात आली होती.

या दौऱ्यात प्रामुख्याने पुणे आणि बारामती परिसरातील विविध शिक्षण संस्था भेटी, तिथले उपक्रम पाहून तेथील वेगवेगळे प्रयोग शिक्षकांना अनुभवायला मिळाले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व मान्यवरांशी संवाद देखील साधावयास मिळाला. ज्ञानप्रबोधिनी, नवनगर विद्यालय निगडी, येथे गुरुकुल विभागाचे प्रमुख आदित्य शिंदे यांनी ‘पंचकोश विकसनातून शिक्षण’ या पद्धतीचा सविस्तर आराखडा मांडून मार्गदर्शन केले व अन्य उपक्रमांची माहिती दिली. लेखक व शिक्षण तज्ञ राजीव तांबे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्मितीवर मार्गदर्शन केले. रवी मुरे यांनी गणित विषयाच्या अभ्यासाने मुलांसमध्ये तर्कसंगत विचार करण्याची सवय वाढीस लागण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

पुणे येथे विद्यार्थी सहायक समितीच्या सभागृहात गीताताई महाशब्दे यांनी गणित विषय सोप्या व रंजक पद्धतीने शिकविण्यावर मार्गदर्शन केले. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा या संस्थेत प्रमोदभाई शिंदे व नामदेव फफाळे शिक्षणाला संस्काराची जोड या विषयावर मार्गदर्शन करताना मुलांच्या विकासासाठी पूरक मार्गदर्शन केले. तसेच ताणमुक्त यश मिळविण्यासाठी बुद्धीवर्धन या अभ्यास पद्धतीवर मार्गदर्शन केले. शारदाबाई विद्यानिकेतन बारामती या संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती शिक्षकांना देण्यात आली. या सहलीदरम्यान दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन, विभागप्रमुख संदीप पाटील, शेखर सोळुंके व दीपक पाटील सोबत होते, असे अनिल भोळे यांनी सांगितले.