प्रेमाला विरोध करणार्‍यांच्या नावानं चांगभलं…!

0

भारतातील आदिम मानवी संस्कृतीत प्रेमाची अनेक उदाहरणे आणि दाखले आपल्याला मिळतात, तरीही भारतीय समाजात प्रेमाला विरोध व्हावे हे नवल आहे. प्रेमासंदर्भात भारताच्या बाहेर पाश्‍चिमात्य देशात भारतातील खजुराहो, वात्सायनाची अनेक संदर्भ दिली जातात. परंतु, त्याच भारतात मोठ्या प्रमाणात प्रेमाला विरोध होत असल्याचा इतिहास आहे. तसां हा विरोध फक्तइतरांच्या प्रेमाला असतो. आपलं म्हणजे प्रेम आणि इतरांचं म्हणजे वासनाच आहे, याच दृष्टिकोनातून पाहण्याची सवय आपल्या मानसिकतेला झाली आहे.

प्यार करनेवाले प्यार करते है शान से, जीते है शान से, मरते है शान से…! या गाण्यातून किंवा अशा अनेक गाण्यांमधून प्रेमाची अफाट ताकद प्रेम करणार्‍या तरुणाईला मिळत असते. या ओळींमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी शान के साथ प्रेमाचे झेंडे अटकेपार लावलेदेखील जातात. मात्र, प्रेम म्हटलं की आपल्या भारतात आणि त्यातल्या त्यात आपण जिथं राहतो तिथं सभ्यता आणि संस्कृतीपासून सुरू होणारी गोष्ट. मात्र, खरं प्रेम हे सभ्यता आणि संस्कृती पाहून केलं जातं का? हा मोठा सवाल. प्रेम होण्याला केवळ गरजेचं असतं ते म्हणजे एकमेकांचं भावनिक गुंतणे. आता आपण याही स्थितीत प्रेम करणारी पोरं पाहतो. प्रेमाला विरोध करणारी एक विशिष्ट जमात आपल्या अवती-भवती नांदत असते. अधिककरून सामाजिक प्रतिष्ठेपायी प्रेमसंबंधांना विरोध करून त्यातून अमानुष हत्या करण्यासारखे प्रकारसुद्धा आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, तर प्रेम मिळवण्यासाठीदेखील अनेक विकृत घटना घडत आहेत. दुसरीकडे सकारात्मक बाब अशी की, आज आंतरजातीय विवाहांचे प्रमाणदेखील वाढते आहे. आजचा युवावर्ग केवळ माणूस हा एकच धर्म मानून बिनधास्त चाकोरी तोडताना दिसून येतोय.

प्रेमीयुगल दिसले की त्यांना छेडणारे, मारहाण करणारे तथाकथित संस्कृती प्रेमी फुल्ल जोशात असतात. खरंतर अशा विशिष्ट दिवशी अशा टोळ्या सक्रिय असतात. त्यामुळे प्रेमवीरांनो अशांपासून सावध राहा. वेगवेगळे दल आणि कोल्ह्याला द्राक्षे आंबट टाईप प्रवृत्या अशा वेळी प्रेम करणार्‍यांना मिळेल त्या मार्गाने विरोध करताना दिसून येतात. मध्यंतरी एकांतात फिरायला गेलेल्या युगलांना मारहाण करण्याच्या प्रकाराचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. अशा वेळी खरोखर संताप होतो. अशा वेळी प्रश्‍न पडतो की खरंच आपण व्यक्तिस्वातंत्र असलेल्या देशात राहतोय का? आता एक मजेची गोष्ट पाहा. अशा मारहाणीच्या घटनांमध्ये एक मात्र असतं, मार खाणारा प्रेमी हा शरीराने हलकाच असतो. नाहीतर धष्टपुष्ट, धिप्पाड, जिमवाल्या प्रियकराला बोलण्याइतका दम यांच्यात नसतो. खर सांगू त्या युगलातला पोरगा मग तो शरीराने कसाही असो, शंड वगेरे नसतो हो, तो प्रामाणिक असतो, त्याला भीती असते सोबत असलेल्या जोडीदाराची म्हणजे आपल्या प्रेमाची.

विरोध करणार्‍यांपेक्षा प्रेम करणार्‍यांची संख्या अधिकच आहे. नवल तेव्हा वाटते जेव्हा की काही प्रेम करणारे पण विरोध करताहेत. भगतसिंहसुद्धा प्रेम करायचे आता त्यांचेच चुकीचे संदर्भ दिले जात आहे. भगतसिंग स्वतः प्रेम करायचे. त्यांच्यावरील साहित्यातून तसे संदर्भदेखील दिलेले आहेत. त्यांच्यावर निर्मित झालेल्या सिनेमांतून ते प्रेम करत असल्याचे दाखवले गेलेय. मात्र, इथ त्यांचेच चुकीचे संदर्भ देऊन देशभक्ती ठरवण्याचे काम यानिमित्तानेदेखील जोरदार सुरू आहे. सोशल मीडियात फोटोशॉप किंग याच्यावर जोरदार काम करत आहेत. अर्थात भगतसिंग आणि अशा सर्वच देशभक्तांचा आपण क्षणोक्षणी आदर करायला हवा आणि आपण तो कितीही केला तरी कमीच पडणारा आहे. मात्र, मग त्याला अशा चुकीच्या पद्धतीने ठसवण्याचा अत्यंत दुर्दैवी प्रकार केला जातोय.

आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुणाविषयी प्रेम एका दिवसात व्यक्त होऊ शकतं का? तर नाही. देश असो, राज्य असो, महापुरुष असो, व्यक्ती असो किंवा आई-बाप किंवा प्रियकर-प्रेयसी कुणाच्याही प्रति आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचं सेलिब्रेशन आपण करतो त्यातून ते प्रेम सिद्ध होईल असे बिलकूल नाही. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला सकाळी झेंडावंदन झाल्यावर दुपारी अनेक तिरंगे रस्त्यावर पडलेले दिसून येतात. अर्थात या मानकांचा सन्मान मनातून होणे जसे आवश्यक आहे अगदी तसेच व्यक्तींबद्दलदेखील आहे. आज तर या व्हर्चुअल जगतात प्रेम व्यक्त करण्याच्या परिभाषादेखील बदलल्या आहेत. आभासी जगतात तयार होत असलेल्या नात्यांमुळे आपण आपल्या जवळच्या नात्यांपासून दूर होत चाललोय, हे बर्‍याच अंशी सत्य आहे. अंबानींच्या पोरांसाठी दिवाळी ही रोज असू शकते. सामन्यांसाठी तसे नाही. म्हणूनच आपण हे एका दिवसाचे सेलिब्रेशन करतो. हा ट्रेंडच मध्यमवर्गीय आणि लोअर क्लाससाठी बनला असावा, असं अनेकदा वाटत राहते. म्हणूनच आपण असे दिवस साजरे करतो असे वाटतं.

भारतातील आदिम मानवी संस्कृतीत प्रेमाची अनेक उदाहरणे आणि दाखले आपल्याला मिळतात. तरीही भारतीय समाजात प्रेमाला विरोध व्हावे हे नवल आहे. प्रेमासंदर्भात भारताच्या बाहेर पाश्चिमात्य देशात भारतातील खजुराहो, वात्सायनाची अनेक संदर्भ दिली जातात. परंतु, त्याच भारतात मोठ्या प्रमाणात प्रेमाला विरोध होत असल्याचा इतिहास आहे. तसं हा विरोध फक्त इतरांच्या प्रेमाला असतो. आपलं म्हणजे प्रेम आणि इतरांचं म्हणजे वासनाच आहे, याच दृष्टिकोनातून पाहण्याची सवय आपल्या मानसिकतेला झाली आहे. काही संस्कृतीरक्षक आपला राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी व्हॅलेंटाइनला विरोध करतात. विरोध करणार्‍या अनेकांना आपण का विरोध करतोय? हेही माहिती नसतं. अशा तत्त्वांनी केवळ हे लक्षात घेतलं तरी बेहतर की आपला जन्म हादेखील प्रेमाच्याच एका प्रक्रियेतूनच झाला आहे.
विशेष टीप:- व्हॅलेंटाइन डेच्या एकाच दिवशी खूप जास्त प्रेम करण्याने प्रेम सिद्ध होत नाही. कुठल्याही दिवसाचे वन डे सेलिब्रेशन मला खरंच चुकीचेच वाटते. प्रेम ही निरंतर प्रक्रिया आहे. निरंतर प्रेम करत राहा.

खरे प्रेम करणारे सार्वजनिक ठिकाणी संस्कृती रक्षकांना वाटणारे अभद्र, अश्‍लील चाळे करत नसतात, अन् करूही नये. सुनसान जागी आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जाऊ नका, सुरक्षेची काळजी घ्या, नृशंस लोकं पब्लिसिटीसाठी काहीही करू शकतात. नाहक बळी पडू नका!

– निलेश झालटे
9822721292