Private Advt

प्रेमसंबंधातून बहिण पळण्याच्या संशयातून भावानेच दिला बहिणीला गळफास

आरोपी भावाला अटक : हट्टी गावातील दुर्दैवी घटना

निजापूर : प्रेमसंबंध असलेली बहिण तरुणासोबत पळून जाणार असल्याचा संशय मनात बळावल्याने भावानेच बहिणीचा गळा आवळून खून केला शिवाय घटनेचे बिंग फुटू नये म्हणून बहिणीने आत्महत्या केल्याचा देखावा केला मात्र पोलिस तपासात व गोपनीय सूत्रांच्या माहितीनंतर ही बाब उघड झाल्यानंतर आरोपी भावाला बेड्या ठोकण्यात आल्या. साक्री तालुक्यातील हट्टी येथे ही धक्कादायक घटना घडली. पुष्पा रमेश हालोर (22, रा. हट्टी) असे मयत तरुणीचे नाव आहे तर संदीप रमेश हालोर (24) या आरोपी भावाला निजामापूर पोलिसांनी अटक केली आहे.

बहिणीची केली हत्या नंतर केला बनाव
सागर बागूल (रा.नवलाने) या तरुणाशी पुष्पा हालोर (22) या तरुणीचे प्रेमसंबंध होते व त्याच्यासोबत ती पळून जाणार असल्याचा संशय भाऊ संदीप रमेश हालोर (24) यास होता. सोमवार, 13 जुन रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास गाव शिवारातील शिवमेंढा येथे पुष्पा हिच्या अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून फास तयार करत तिला गळफास दिला व नंतर घरी जावून पुष्पा हिने स्वतःच्या हाताने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे भासवून आई, मित्र तसेच ग्रामस्थांना खोटी माहिती दिली व पहाटेच्या सुमारास बहिणीवर घाई-घाईत अंत्यविधी उरकला व अंगावरील सर्व कपडे, गळफानिस तयार केलेल्या साडीची लेस असे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतुने दहनात टाकून पुरावे नष्ट केले मात्र आरोपी बहिणीने आत्महत्या केल्यानंतर त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्याबाबत लपवा-लपव करीत असल्याने संशय बळावला व पोलिसांच्या खबर्‍याने ही माहिती निजामपूर पोलिसांना दिल्यानंतर चौकशी केल्यानंतर आरोपीचे बिंग उघडे पडले.

आरोपीविरोधात निजामपूर पोलिसात गुन्हा
नाईक संदीप ठाकुर यांनी निजामपूर पोलिसात आरोपी संदीप रमेश हालोर याच्याविरोधात भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक वारे करीत आहेत.