प्रेमसंबंधाच्या वादातून बापाने केला मुलीचा खून

0

धरणगाव । परधर्मीय तरूणासोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून एका 28 वर्षीय तरूणीचा बापाने गळा आवळून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात अब्दुल कय्युम अब्दुल रहीम मनियार (वय 67) यांच्या विरोधात भादंवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परधर्मीय मुलासोबत प्रेमसंबंध  धरणगाव शहरातील पिल्लू मशिद परिसरात राहणारे अब्दुल कय्युम अब्दुल रहीम मनियार (वय 67) यांची मुलगी नसरीनबी (वय 28) हिचे परधर्मीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. 2 जानेवारीच्या रात्री 10.30 वाजेच्या सुमारास नसरीनबी हिला भेटण्यासाठी संबंधित तरूण आला होता. मनियार यांना ही बाब प्रचंड खटकली. यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला. मनियार यांनी आपल्या मुलीला त्या मुलाविरूध्द पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. परंतु नसरीनबीने या गोष्टीस स्पष्ट शब्दात नकार दिला. या संदर्भात मनियार यांनी आपल्या भावाच्या घरी जाऊन मुलीला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु नसरीनबी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या मनियार यांनी मुलीला परत रात्री 3.30 वाजेच्या सुमारास घरी आणत मारहाण करायला सुरूवात केली व संतापाच्या भरात तिच्याच दुपट्याने तिचा गळा आवळला. थोड्याच वेळात नसरीनबी जागेवरच मयत झाली. या संदर्भात अब्दुल कय्युम अब्दुल रहीम मनियार यांच्याविरूध्द भादंवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तरूणी होती घटस्फोटीत मयत नसरीनबी हिचा काही दिवसांपूर्वी आपल्या पतीसोबत घटस्फोट झालेला होता. तिला दोन लहान मुले आहेत. धरणगावात परत आल्यानंतर तिचे संबंधित तरूणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. आजच्या घटनेमुळे मात्र त्या दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आई व आजोबा दोघांचे छत्र हरपले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रूग्णालयात सुरू होते. पुढील तपास पो.नि. दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बोरकडे हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.