प्राध्यापक संघटनांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार-विनोद तावडे

0
मुंबई – प्राध्यापकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आज सविस्तर चर्चा झाली. त्या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली, त्यामध्ये सातवा वेतन आयोग, पद भरतीचा विषय, ७१ दिवसाच्या प्राध्यापकांच्या संप काळातील वेतन, विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचा विषय आदी होते. या सगळ्या विषयांमध्ये शासन काय पध्दतीने सकारात्मक विचार करते आहे, याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. आजच्या बैठकीतील लिखीत मिनीट्स दोन्ही संघटनांना दिले जातील आणि मला खात्री आहे जी सकारात्मक शासनाची भूमिका त्यांच्या मागण्यांसंदर्भात आहे, ती पाहता प्राध्यापकांचा बेमुदत संप मागे घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी बैठकीनंतर प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
सरकारकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध प्राध्यापक संघटनांचे प्रतिनिधी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्यासमवेत आज एक बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार बी. टी. देशमुख, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार श्रीकांत देशपांडे, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे डॉ. अनिल कुलकर्णी, प्राध्यापक वैभव नरवडे, प्रदीप खेडेकर, एम फुक्टो शिक्षक संघटनेचे सरचिटणीस डॉ. लवांडे, डॉ. मुखोपाध्याय, डॉ. परांजपे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे प्रलंबित वेतन, सातवा वेतन आयोग, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची भरती प्रक्रिया चालू करणे आदी विविध मागण्यांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली. प्राध्यापक संघटनांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मकरित्या प्रयत्न करीत आहे. प्राध्यापकांच्या विविध मागण्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले विषय सविस्तरपणे मांडले.
Copy