Private Advt

प्रस्ताव दिल्यास भुसावळची हद्दवाढ करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

भुसावळात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण व विकासकामांचे उद्घाटन

भुसावळ : शहराला लागून असलेल्या मात्र पालिका हद्दीत समाविष्ट नसलेल्या भागात निधीअभावी कामे होत नसल्याने हा भाग पालिका हद्दीत समाविष्ट होण्यासाठी प्रस्ताव दिल्यास ठाकरे सरकार निश्चित हद्दवाढ करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. शुक्रवार, 17 रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्याहस्ते पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

गुंडगिरी ठेचून काढा ; अजितदादा
पालकमंत्र्यांनी भुसावळातील गुन्हेगारीवर बोट ठेवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पोलिसांनी भुसावळातील गुन्हेगारी ठेचून काढावी यासाठी मी आत्ताच सूचना देत आहे. शहरात जातीय सलोखा राखला जाणे गरजेचे आहे. कुणीही व्यक्ती चुकत असेल त्याला सरळ करणे पोलिसांचे काम असल्याचा मार्मिक टोलाही त्यांनी हाणला.

चांगल्या लोकांना निवडून द्या
शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासंदर्भात मुंबईत बैठक घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले की, सारखे-सारखे पाणीपुरवठ्याचे सोर्स बदलणे योग्य नाही. शहरातून तापी नदी गेल्याने तिचे पावित्र्य राखणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पांची गरज आहे. शहर विकासासाठी चांगल्या व व्हिजन असलेल्या लोकांना निवडून द्या, असेही ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील कारखाने बाहेरील जिल्ह्यात लोक घेवून चालवत आहेत, असे सांगून आपल्या पुतण्यानेच चोपडा कारखाना घेतला, असेही ते म्हणाले. पालिकेच्या सुविधा हव्या तर कर भरणा करायलाच हवा, असे सांगत डीपीडीसीतून सीसीटीव्हीसाठी जितका निधी देण्यात येईल तितकाच निधी राज्य सरकार देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नगरपालिकेने उत्पन्न वाढीचे मार्ग वाढवायला हवेत, असे सांगून अतिक्रमणाच्या बाबतीत शहरातून तक्रारी आल्याने पालिकेने कारवाई करावी व त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त पुरवावा, अशा सूचना त्यांनी केल्या. पालिकेने हॉकर्स झोनसाठी आरक्षण ठेवावे, असेही ते म्हणाले.

आमदारांच्या पक्षांतरावर अजितदारांचा खोचक टोला
राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या आमदार संजय सावकारे यांना उद्देशून अजितदादा म्हणाले की, आधी घड्याळाच्या चिन्हावर निवडून आले व नंतर दुसर्‍या चिन्हावर निवडून आले मात्र आता वेगळे चिन्ह शोधा, असा उपरोधिक टोला अजितदादांनी मारल्याने सभेत खसखस पिकली.

विकासकामांचे ऑनलाईन उद्घाटन
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते भुसावळ पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ऑनलाईन रीमोटची कळ दाबून करण्यात आले. तत्पूर्वी जुना सातारा भागातील लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

भुसावळच्या विकासासाठी निधी द्या : रमण भोळे
प्रास्ताविकात रमण भोळे यांनी शहरातील यापूर्वी व सत्ता आल्यानंतरच्या परीस्थितीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, पालिकेत निधी पडून असतानाही काही तथाकथित लोकांच्या हस्तक्षेपामुळे कामे करता आली नाहीत. असे असताना दिवाबत्तीपासून रस्ते सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शंभर टक्के विकासाची कामे झालेली नाहीत मात्र आता विकासाची घौडदोड सुरू झाली आहे. खासदार व आमदारांनी मदतीचात हात दिल्यानंतर 750 हायमास्ट शहरात लावण्यात आले. पालकमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून शहराचे अद्याप ग्रहण सुटले नसल्याने मोठ्या प्रमाणावर उपमुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

दादा, पुन्हा-पुन्हा भुसावळात या : आमदार संजय सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, सोशल मिडीयावर जो तो नागरीक उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पुन्हा-पुन्हा भुसावळात यावे, असे म्हणत आहे, एकाने तर हे लीप ईअर आहे का? असा प्रश्नदेखील विचारल्याचे ते म्हणाले. शहरात स्वच्छतेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून रस्त्यांची कामेदेखील होत आहेत त्यामुळे ही फार पूर्वीच झाली असती तर बरे झाले असते मात्र उशिरा का होईना कामे होत असल्याचे समाधान आहे. अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची बिकट परीस्थिती निर्माण झाली असून हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करीत शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी द्यावा, अशी मागणीही केली. पालिकेतील रीक्त पदांचा प्रश्न, अमृतच्या वाढीव प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

खडसे म्हणाले ; अस्वच्छतेतून शहर सावरले नाही
माजी मंत्री खडसे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपूर्वी स्थिती काय होती हे मी सांगणार नाही कारण भुसावळकरांनी ते अनुभवले आहे. आता रस्त्यांची कामे सुरू आहेत, स्वच्छता होत आहे मात्र अस्वच्छतेतून शहर अद्याप सावरले नसल्याची कबुली त्यांनी दिली. घरकुलांचा प्रस्ताव प्रलंबित असून त्यास मंजुरी मिळावी तसेच अमृतच्या विस्तारीत योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संजय सावकारेदेखील आमचेच : नाथाभाऊ
माजी मंत्री संजय सावकारे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अलीकडेच खडसेंनी सावकारेंना केक भरवल्यानंतरच्या कार्यक्रमात चर्चेत आल्या मात्र आपण भाजपा सोडणार नाही, अशी भूमिका सावकारे यांनी मांडली. त्यानंतर आजच्या कार्यक्रमात माजी मंत्री खडसेंनी आमदार संजय सावकारेदेखील ‘आमचेच असल्याचे’ वक्तव्य करून पुन्हा खळबळ उडवून दिली. ते म्हणाले की, पालिकेची मुदत 25 डिसेंबर रोजी संपत असलीतरी आमदारांची टर्म बाकी असल्याने त्यांनी दोन कोटींचा निधी पालिकेला विकासकामांसाठी द्यावा, असे सांगताच आमदारांनी पालिकेला तीन कोटींचा निधी यापूर्वीच दिल्याचे व्यासपीठावरच खडसेंना सांगितले.

शुक्राचार्यांनी केला शहराचा सत्यानाश ; पालकमंत्री
आपल्या आक्रमक शैलीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणाला सुरूवात करीत भुसावळातील गुन्हेगारीवरच बोट ठेवले. ते म्हणाले की, पालिकेत येथे सीओ यायला तयार नव्हते मात्र आम्ही ते आणले व ते आता पोलिस संरक्षणात काम करीत आहेत. असे महाराष्ट्रात कुठेही घडलेले नाही, पोलिसांवर हात उचलण्याची मजल येथल्या गुन्हेगारांची झाल्याने आय, आयपीएस दर्जाचे अधिकारी शहराला मिळावेत, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. ते म्हणाले की, काही शुक्राचार्यांनी भुसावळ शहराचा सत्यानाश केला असून काही गुंडाचा शहरात प्रभाव वाढल्याने त्यांच्यावर वचक निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून त्या गुंडामागे नगरसेवकांनीदेखील उभे राहण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मृत्यू जर अटळ आहे तर दहा दिवस मर्दासारखे जगायला आवडेल, असेही त्यांनी सांगितले.

अमृत वाढीव योजनेला मंजुरी मिळावी
पालकमंत्री म्हणाले की, अमृत योजनेचा योग्या स्त्रोत न निवडण्यात आल्याने योजना लांबणीवर पडून 90 कोटींची योजना 185 कोटींवर पोहोचली आहे. आता वाढीव भागाचा यात समावेश झाल्याने वाढीव योजनेला मंजुरी मिळण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. जळगावसह भुसावळात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नितांत आवश्यकता असून त्या संदर्भात डीपीडीसीतून निधी देण्यासाठी प्रयत्नशील असून आपण गल्ला मंत्री (अर्थमंत्री) निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर), लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा निमंत्रक अविनाश आदिक, नगरसेवक मुकेश पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रा.दिनेश राठी, अमोल इंगळे, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी मकासरे, शैलजा नारखेडे, पिंटू ठाकूर, सविता अहिरे, पूजा सूर्यवंशी, माजी नगरसेवक वसंत पाटील, दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, शरीफ ठेकेदार, पुरूत्तोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, अजय नागराणी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.