प्रशासन मेडिकल चालकांना केव्हा देणार कोविड प्रतिबंधक लस?

जळगाव – फ्रंटलाईन वर्कर, पोलीस, वकील व न्यायालयीन कर्मचारी, पत्रकार यांना कोविड प्रतिबंधक लस मिळते, तर मग गेल्या वर्षभरापासून आपला जीव धोक्यात टाकून काम करत असलेल्या मेडिकल चालकांना लस का मिळत नाही ? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

केंद्र व राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करताना सुरुवातीच्या टप्प्यात कोविड योद्ध्ये अथवा फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरच्या दुसर्‍या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले. या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झालेले नसताना 18 ते 44 वयोगटातील लाभार्थींना लस देण्यात येऊ लागली. लसीकरणाची ही मोहीम सुरू असतानाच फ्रंटलाईन वर्कर, पोलीस व त्यांचे कुटुंबीय आणि गेल्याच आठवड्यात वकील व न्यायालयीन कर्मचारी यांचे कुटुंब, तसेच पत्रकारांना देखील लस देण्यात आली. या सर्वांना जर प्रशासनाकडून लस मिळत आहेत, तर मग गेल्या एक वर्षांपासून कोरोना प्रादूर्भावाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना औषधांची सेवा देणारे मेडिकल चालक मात्र, लसीकरणात दुर्लक्षित का केले जात आहेत ? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. फ्रंटलाईन वर्कर यांच्या बरोबरीने आमचेही काम तेवढेच महत्त्वाचे किंबहुना तोडीस तोड आहे, त्यामुळे प्रशासनाने आमच्याकडे देखील लक्ष देऊन आम्हालाही लस द्यायला हवी, असा सूर मेडिकल चालकांमध्ये आहे.

संघटना काय करतेय ?

जळगाव जिल्ह्यात मेडिकल चालकांची ‘जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशन’ या नावाची संघटना आहे. आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी संघटनेचे पदाधिकारी नेमके काय करताहेत याविषयी अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्याशी ‘जनशक्ती’ने संपर्क साधला. ते म्हणाले की, मेडिकल चालकांना लस मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत पण आम्हाला दाद मिळत नाही. एखाद्या डॉक्टरांच्या माध्यमातून लसीकरण होणे सोयीचे होईल हे लक्षात घेऊन तसा प्रस्तावही दिला आहे. त्यावर प्रशासनाने कळवतो एवढेच उत्तर दिले पण त्यालाही 15 दिवस उलटून गेेले आहेत. जळगावमध्ये 700 मेडिकल चालक आहेत. तेथे काम करणारे कर्माचारी आहे. या सर्वांना व त्यांच्या कुटुंबियांना लस मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी सुनील भंगाळे यांनी केली.