प्रवासी गाड्या धावतात उशिरा

0

रावेर । येथील सुमारे एक हजार प्रवासी दररोज भुसावळ, जळगाव, सुरत इतरत्र जाण्यासाठी रेल्वने प्रवास करतात. मात्र, या सर्वांच्या सोयीसाठी नवीन गाड्या सुरू करणे, एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळणे दूरच साधी इटारसी-भुसावळ पॅसेंजर देखील वेळेवर चालत नसल्याने रावेरकरांच्या पदरी उपेक्षा पडत आहे. मात्र, याविषयी ना लोकप्रतिनिधींना फिकीर, ना अधिकार्‍यांना देणे-घेणे अशी स्थिती आहे. भुसावळकडून उत्तर भारताकडे जाताना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील रावेर स्थानकाचा अद्याप विकास आणि विस्तार झालेला नाही. रेल्वेद्वारे होणार्‍या केळी वाहतुकीमुळे देशभर ओळखले जाणारे तालुक्यातील अनुक्रमे रावेर, निंभोरा आणि सावदा येथील मालधक्केदेखील कधीच इतिहासजमा झाले आहेत. हे कमी म्हणून की काय, प्रवाशांना अपेक्षित सेवा-सुविधा देखील मिळत नाहीत. घसा सुकेपर्यंत नवीन गाड्यांना थांब्याची केलेली मागणी कचराकुंडीत फेकली गेल्याने रावेरकरांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यात इटारसी ते भुसावळदरम्यान धावणारी पॅसेंजर वेळेवर चालत नसल्याने ’भीक नको पण कुत्रं आवरं’ असे अनेक प्रवासी उपहासाने म्हणतात. दरम्यान, रावेर रेल्वे स्थानकावर सध्या कुशीनगर, ताप्तीगंगा एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस कामायानी या गाड्यांना थांबा आहे. मात्र, भुसावळ, जळगावकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या पाहता इतरही गाड्यांना थांबा मिळण्याची मागणी असली ती सातत्याने दुर्लक्षित आहे.

पुढील प्रवासाला होतो विलंब
इटारसीवरुन निघालेली भुसावळ पॅसेंजर खंडवा, बर्‍हाणपूर आल्यावर तब्बल दोन-दोन तास पडून असते. परिणामी, पुढील प्रवासाला विलंब होतो. भुसावळ स्थानकावरून सुटणार्‍या सुरत, भुसावळ-अमरावती, भुसावळ-मुंबई आदी पसेंजर गाड्या निघून गेलेल्या असतात.

केवळ आश्‍वासन
रावेरमध्ये सचखंड, महानगरी, नागपूर एक्स्प्रेस (इंटरसीटी मार्गे जाणारी), पुणे-पटना या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी आहे. दरम्यान, या गाड्यांना रावेरात थांबा देण्याचा विषय रेल्वे मंत्रालयाच्या अख्खत्यारितील विषय आहे. मात्र, भुसावळ विभागाच्या कार्यक्षेत्रातील पॅसेंजर गाडी वेळेवर चालवणे, हा स्थानिक डीआरएम यांच्या अधिकारातील विषय आहे. यासाठी विचारणा केली असता माहिती घेवून प्रश्न सोडवू असे खासदार रक्षा खडसेंनी सांगितले.

इतर गाड्या सापडत नाहीत
तत्कालिन खासदार जावळे यांच्या प्रयत्नांमुळे कामायनी ताप्तीगंगा एक्स्प्रेसला रावेरात थांबा मिळाला होता. सोबतच विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायीकांच्या सोयीची इटारसी-भुसावळ पसेंजर वेळेवर चालावी असा आग्रह आहे. कारण इटारसीकडून येणार्‍या पॅसेंजरची वेळ रावेरात सकाळी वाजेची असली तरी ती कधीही वेळेवर येत नाही. उशिराने येणार्‍या या पॅसेंजरमुळे भुसावळातून मुंबई वा सुरतकडे जाणारी पसेंजर, इतर गाड्या सापडत नाहीत.