प्रवाशाला झोपेतून न उठवल्याने रेल्वेला 5 हजारांचा दंड

0

भोपाळ । रात्री झोपेमुळे प्रवाशांचे स्टेशन पुढे जाऊ नये म्हणून रेल्वेने वेेकअप कॉल सेवा सुरू केली आहे. रेल्वेला वेकअप कॉलची विनंती केल्यावर रेल्वे तुम्हाला स्टेशन येण्याच्या अर्धा तास आधी तुमच्या मोबाइलवर अलार्म देऊन तुम्हाला जागे करते. मात्र, रेल्वेने स्टेशन येण्याआधी संबंधित प्रवाशाला वेकअप कॉल दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने रेल्वेला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना आहे. मध्य प्रदेशच्या बेतुल जिल्ह्यातील. गिरीश गर्ग हे 13 जून 2015 रोजी कोईमबतूर-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसने कोटा येथे चालले होते. त्यामुळे गिरीश गर्ग यांनी त्यांच्या मोबाईलवरून रेल्वेच्या 139 क्रमांकावर फोन करून ग्राहक सेवा अधिकार्‍याला वेकअप कॉल देण्यास सांगितला. गिरीश गर्ग यांना ग्राहकसेवा अधिकार्‍याने तुमचा नंबर रजिस्टर झाला असून, स्टेशन येण्याआधी तुमच्या मोबाइलवर कॉल येईल असे सांगितले. त्यामुळे झोपून गेले. पण गर्ग यांच्या मोबाइलवर ना मेसेज आला, ना कुठला कॉल. कोटा स्थानक आल्यानंतर गर्ग यांना जाग आली पण ट्रेनमधून उतरताना त्यांची धावपळ झाली.

रेल्वेच्या जबाबदार वर्तनासाठी गिरीश गर्ग यांनी ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला. त्यांनी रेल्वेला 20 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली, तर रेल्वेने 139 क्रमांकाच्या सुविधेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे ही याचिका रद्द करावी असा प्रतिवाद केला. पण ग्राहक न्यायालयाला रेल्वेचा दावा पटला नाही. न्यायालयाने रेल्वेला गर्ग यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 5 हजार रुपये नुकसानभरपाई आणि 2 हजार रुपये कायदेशीर लढाईचा खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले.

काय आहे वेकअप कॉल सुविधा
या सुविधेचा वापर करणं अगदी सोप्प आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरून 139 हा नंबर डायल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला काही सूचना दिल्या जातील. तुम्हाला तुमच्या तिकिटाचा पीएनआर नंबर विचारला जाईल. पीएनआर नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला स्टेशनचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर तुम्ही बिनधास्त झोपू शकता. तुम्हाला ज्या स्टेशनवर उतरायचं आहे. ते स्टेशन येण्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अलर्ट कॉल येईल आणि तो कॉल तुम्हाला झोपेतून जागे करेल. तुम्ही जेव्हा 139 नंबरवर तुमची आवश्यक माहिती पुरवाल, तेव्हा सिस्टिम तुमच्या ट्रेनचे पूर्ण स्टेटस चेक करेल. ज्या ठिकाणी तुमची गाडी असेल याची माहिती सिस्टिम घेईल. आणि त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल.