‘प्रभू’साक्षीने घडलेली हिंदुत्ववादी पोटनिवडणूक!

0

महाराष्ट्राच्या राजकारणात डॉ. रमेश प्रभूंचे नाव तसे मोठे नसले तरी देशाच्या राजकारणात‘हिंदुत्वा’च्या विषयावरून लढवलेल्या पहिल्या पोटनिवडणुकीचे ते उमेदवार होते. त्यामुळे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषवाक्याने प्रचार करून देशभरात खळबळ माजवणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने डॉ. प्रभू 1987-88 ला प्रसिद्धीच्या झोतात राहिले होते.

राजकीय क्षेत्राच्या पटलावर एखादी व्यक्ती कधी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल आणि केव्हा विस्मृतीच्या खोल दरीत गडप होईल हे सांगता येत नाही. राजकारणातील हीच अस्थिरता राजकीय नेत्यांना नेहमीच दडपणाखाली ठेवत असते. जनमानसाच्या मनात असणारी आपली प्रतिमा धूसर झाली तर आपण विस्मृतीच्या अंधारात ढकलले जाऊ, अशी अनामिक भीती राजकारणात कार्यरत असलेल्या नेते मंडळीना वाटत असते. म्हणूनच राजकीय नेते सतत आपल्याकडे फोकस राहावा यासाठी वादग्रस्त विधाने वा अशक्य असलेली आश्‍वासने देत चर्चेत राहण्याचा अट्टाहासी प्रयत्न करीत असतात.
र ाजकीय नेत्यांना विस्मृतीची वाटणारी भीती अनाठायी नसते. कारण एकेकाळी लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन जनमानसात लोकप्रिय झालेल्या नेत्यांना कालांतराने एकांतवासाच्या गर्देत राजकीय वनवास भोगावा लागलेली अनेक उदाहरणे त्याला साक्षी आहेत. अशाच प्रकारचे एक उदाहरण मुंबईत डॉ. रमेश प्रभूंच्या निधनाने समोर आल्याने येथे त्याची दखल घ्यावीशी वाटते.
शिवसेनेचा राजकीय झंझावात 1985 नंतर राज्यभर सुरू झाला. त्या काळात डॉ. रमेश प्रभू हे शिवसेनेचे मुंबईतील एक शिलेदार होते. मुंबईतील विलेपार्ले भागातील नगरसेवक म्हणून ते 1985 साली निवडून आले. 1987च्या कालावधीत त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले होते. देशभरात गाजलेल्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनेचे आमदार म्हणून ते जिंकून आल्याने 1987-88 मध्ये त्यांच्या नावाचा डंका मुंबई-महाराष्ट्रापासून थेट दिल्लीपर्यंत वाजला होता. पुढे याच डॉ. प्रभूंनी 2004 ला शिवसेना सोडली. प्रथम राष्ट्रवादी पक्षात व नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राजकारण केले. तेथे त्यांना यश मिळाले नाही. ते विस्मृतीच्या गर्तेत सापडल्याने 11 डिसेंबरला झालेल्या त्यांच्या निधनाची साधी दखलही राजकीय क्षेत्रात घेतली गेली नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात डॉ. रमेश प्रभूंचे नाव तसे मोठे नसले तरी देशाच्या राजकारणात ‘हिंदुत्वा’च्या विषयावरून लढवलेल्या पहिल्या पोटनिवडणुकीचे उमेदवार होते. त्यामुळे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषवाक्याने प्रचार करून देशभरात खळबळ माजवणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने डॉ. रमेश प्रभू 1987-88 ला प्रसिद्धीच्या झोतात राहिले होते. राजकारणात उतार चढाव हे येतच असतात. डॉ. रमेश प्रभूंनी शिवसेनापक्ष सोडताना राजकीय उतावळीपणा केल्याने त्यांचे शिवसेना पक्षातील कार्य फार विस्मृतीस गेले. त्यांची स्वतःची राजकीय ओळख हरवली व राजकारणातले महत्त्व संपले. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूची बातमी कुठल्याच राजकीय पक्षाला महत्त्वाची वाटली नाही.
राजकारणात विस्मृतीस जाणे हे असे वेदनामय, स्वतःची ओळख हरवणारे असते. डॉ. प्रभू यांचे राज्य पातळीवर राजकीय योगदान शून्यवत असले तरी भारतीय निवडणुकीच्या इतिहासात एका वादग्रस्त पोटनिवडणुकीचे उमेदवार म्हणून त्यांची नोंद अबाधित राहणार आहे. म्हणूनच 1987 च्या पोटनिवडणुकीचे राजकीय महत्त्व समजून घेणे फारच महत्त्वाचे ठरते. 1980 च्या दशकात महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलत होते. 1966 पासून मुंबईतील मराठी माणसांच्या न्याय-हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून कार्यरत असणारी शिवसेना 1985ला मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर येताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, मुंबई जिंकली! आता घोडदौड महाराष्ट्रात! अशी घोषणा करत राज्य पातळीवर राजकारण करण्याचा मानस व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांनी राज्याचे राजकारण करताना मराठीच्या मुद्द्यासोबत हिंदुत्वाचा विषय मांडण्यास सुरुवात केली. खलिस्तानवादी व मुस्लीम समाजाची फुटीरता यावर बिनधास्त बोलत, हिंदूचे रक्षण शिवसेनाच करू शकते असा विचार मांडत शिवसेनाप्रमुखांचा झंझावात महाराष्ट्रात उभा राहत होता.
अशा राजकीय परिस्थितीत मुंबईतील विलेपार्ले विभागातील काँग्रेसचे आमदार हंसराज भुग्रा यांचे निधन झाल्याने डिसेंबर 1987 ला तेथे पोटनिवडणूक घेण्याचे ठरले. शिवसेनाप्रमुखांनी या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणायचा ठरवून पार्ले येथील लोकप्रिय नगरसेवक डॉ. रमेश प्रभू यांनी उमेदवारी दिली. काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर कुंटे, भाजपाचा पाठिंबा असलेले जनता पक्षाचे उमेदवार प्राणलाल व्होरा यांच्यासमोर शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू अशी तिरंगी लढत होती. शिवसेनाप्रमुखांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा नारा देत निवडणुकीच्या प्रचारात प्रथमच उघडपणे ‘हिंदुत्वा’चा मुद्दा ठळकपणे मांडला.
बहुभाषिक असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार डॉ. रमेश प्रभू बहुमताने निवडून आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही पोटनिवडणूक लढवली गेल्याने याची चर्चा देशभरात झाली. शिवसेनेचा राजकीय दबदबा वाढला. भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 1989 ला शिवसेनेसोबत युती केली. शिवसेनाप्रमुखांनी निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून काँग्रेसचे उमेदवार न्यायालयात गेले. 1989 ला न्यायालयाने धर्माच्या नावावर मते मागणे हे चूक असल्याचे सांगत डॉ. प्रभू यांची निवडणूक रद्द केली. शिवसेनाप्रमुखांवर केस सुरूच राहिली त्यावर 1999ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना हिंदुत्वाचा प्रचार केल्याबद्दल सहा वर्षांसाठी मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आला. डॉ. प्रभू कालांतराने राजकीय विजनवासात गेले, पण 1987च्या ऐतिहासिक पोटनिवडणुकीचे ते साक्षीदार होते, हे विसरता येणार नाही.

दखलनामा
विजय य. सामंत
9819960303