प्रभात सोडाजवळ तरूणाला ‘पब्लिक मार’

0

जळगाव। शहरातील नवीपेठे परिसरातील प्रभात सोडा दुकानासमोर गुरूवारी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास मैत्रिणीशी बोलणार्‍या तरूणाला 8 ते 10 तरूणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर तरूणाने व त्याच्या मैत्रिणीने शहर पोलीस ठाणे गाठत मारहाण करणार्‍या तरूणांविरूध्द तक्रार दिली.े या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

क्लास लावण्यासाठी आले होते दोघे

वरणगाव येथील चायनिज खाद्य पदार्थ गाडीवर कामावर असलेला समीर मेहमूद शेख (वय-25) व त्याची वरणगाव येथील मैत्रीण वेदिका (नाव बदललेले) स्पर्धा परीक्षेच्या क्लासमध्ये पोलिस भरतीचे क्लास लावण्यासाठी गुरूवारी शहरात बसने आलेले होते. यानंतर काम संपवून दोघेही परत चालले होते. यानंतर नवीपेठेतील प्रभात सोडा फाऊंटनजवळ देविका तिचा मित्र समीर शेख हे काही वेळ ते रस्त्यावर गप्पा मारत उभे होते. दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास अचानक 8 ते 10 तरूण त्या ठिकाणी आले. त्यांनी काहिही कारण नसताना समीर याला मारहाण करण्यात सुरूवात केली. बेदम मारहाण केल्यानंतर सर्व तरूण त्या ठिकाणाहून पसार झाले. एका व्यावसायिकाने शहर पोलिस ठाण्यात फोन करून घटनेच्या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी आले. त्यांनी समीर याला पोलिस ठाण्यात नेले. यानंतर त्याने मारहाण करण्यार्‍यांविरुध्द तक्रार दाखल केली.