प्रभाग 1 मध्ये भाजप उमेदवारांना उदंड प्रतिसाद

0

पिंपरी : चिखली परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुंदन गायकवाड (अ), स्वीनल म्हेत्रे (ब), अलका मोरे (क) व पांडुरंग साने (ड) या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचाररॅली, पदयात्रा, डोअर टू डोअर करण्यात येत असलेल्या प्रचाराला येथील नागरिक मोठा प्रतिसाद देत आहेत. भोसरी मतदारसंघांचे आमदार महेश लांडगे यांनी या प्रभागातील उमेदवार आणि त्यांच्या प्रचाराकडे लक्ष पुरवले असून तेही सहभाग नोंदवत उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवत आहेत. शहर आणि या प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनाचे साक्षीदार व्हा, अशी साद भाजपच्या उमेदवारांनी घातली आहे.

पांडुरंग साने यांचा दांडगा जनसंपर्क

साने यांच्यासह त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या सोबतीने म्हेत्रे वस्ती, मोरे वस्ती, रामदासनगर, चिखली गाव, धर्मराजनगर, सोनवणे वस्ती व शेलार वस्ती परिसर पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली आहे. अनेक कार्यकर्ते वैयक्तिक प्रचार करत त्यांना हातभार लावत असल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग साने हे या परिसरातील सर्वपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड देत जनसामान्यांची सेवा व सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा प्रभागात मोठा जनसंपर्क आहे.

प्रस्तापितांसमोर आव्हान

पांडुरंग साने यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्यासह भाजपच्या सर्व पॅनलला येथील तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. दांडगा जनसंपर्क व सामाजिक कार्यामुळे या प्रभागात भाजपचा विजय निश्‍चित मानला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपच्या चारही उमेदवारांकडून पदयात्रा, भेटी-गाठी तसेच प्रत्यक्ष संवाद साधत भाजपची ध्येय-धोरणे मतदारांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने नव्या व युवा चेहर्‍यांना संधी दिल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.