प्रत्यक्षात पेट्रोल ४.३७ रुपयांनीच झाले स्वस्त

0

मुंबई- महाराष्ट्रात पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी करण्यात आले आहे असे असले तरी प्रत्यक्षात प्रति लिटर पेट्रोलवर ४.३७ रुपये कमी झाले आहे. आज मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचा दर ८६.९७ रुपये आहे. डिझेलवर २.६५ रुपये कमी झाले असून प्रति लिटर डिझेलचा दर ७७.४५ रुपये आहे.

डिझेलवर केंद्राने अडीच रुपयांची करकपात केली असली, तरी राज्याने मात्र कर कायम ठेवल्याने डिझेलचे दर प्रतिलिटर अडीच रुपयांनीच कमी झाले आहेत. इंधनावर आकारले जाणारे केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्यात आले असून प्रति लिटर दीड रुपयांचा केंद्र सरकार तर एक रुपयांचा बोजा तेल कंपन्या उचलतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रत पेट्रोलवरील कर अडीच रुपयांनी कमी केल्याने सरकारी तिजोरीला वार्षिक १२५० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांनी दिली. तर कर कपातीमुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्याचबरोबर देशाचा विचार करता डिझेलच्या दराबाबत महाराष्ट्राचा आठवा क्रमांक असल्याने सध्या डिझेलवरील करात कपात केली नसल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्राप्रमाणे राज्यांनीही मूल्यवर्धित करात अडीच रुपयांची कपात करण्याचे आवाहन जेटली यांनी केले. या आवाहनला भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनी तातडीने प्रतिसाद दिला. त्यामुळे महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आदी राज्यांमध्ये इंधन दरकपात प्रति लिटर पाच रुपये झाली आहे. इंधनाचे दर ६० डॉलरवरून ८५ डॉलर इतके झाले. म्हणजे २५ डॉलरची वाढ झाली. राज्यांच्या महसुलातही २९ टक्के वाढ झाली. त्यामुळे त्यांच्या तिजोरीत अतिरिक्त निधी जमा झाला असल्याने मूल्यवर्धित कर कमी करण्यास हरकत नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.

Copy