प्रजासत्ताक दिनासाठी विभागप्रमुखांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी

0

धुळे : भारतीय प्रजासत्ताकाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी 2017 रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी पोलिस मुख्यालय, कवायत मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ होईल. मा. पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. या पार्श्वभूमीवर सर्व विभागप्रमुखांनी आपल्याला नेमून दिलेली कामे समन्वयाने करीत वेळेत पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले.

सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पूर्व तयारीची बैठक आज सकाळी झाली. त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), पंकज चौबळ (भूसंपादन), जे. आर. वळवी (निवडणूक), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मत जाधव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, तहसीलदार अमोल मोरे (धुळे ग्रामीण), अपर तहसीलदार ज्योती देवरे (धुळे), तहसीलदार अनिल गावित यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

तयारी जोरात सुरु
जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाचा, नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर संबंधित विभागाने स्वच्छ ठेवावा. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार असल्याने मैदानाची लेव्हलिंग व आवश्यक दुरुस्तीच्या कामाला गती द्यावी. मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी प्रभात फेऱ्यांचे नियोजन करावे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करुन त्याचा नियमितपणे सराव करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी दिले.