Private Advt

प्रचंड गदारोळात लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करुन देण्यासाठी उभे राहिले होते. विरोधकांकडून यावेळी गदारोळ घातला जात असल्याने मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला. इतक्या महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री बनवण्यात आल्यानंतर संसदेत उत्साह असेल असं मला वाटलं होतं असा टोला यावेळी त्यांनी लगावला.
“मला वाटलं होतं की, इतक्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्याने संसदेत उत्साह असेल. यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नाही आहेत,” असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना सुनावलं. यादरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी परखड प्रश्न विचारा पण सरकारलाही शांततामय वातावरणात उत्तर देऊ द्या, अशी विनंती विरोधकांना केली.विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

संसदेबाहेर आंदोलन

तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शिरोमणी आकाली दलाच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. देशातील शेतकऱ्यांना न्याय हवा आहे. सर्व पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात उभं राहावं आणि कायदा परत घेण्यावर त्यांच्यावर दबाव टाकावा, असं शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल म्हणाले.