प्रगतीसाठी आवश्यकता वाढवून इच्छांवर नियंत्रण ठेवावे -डॉ.जगदीश पाटील

0

नाहाटा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे वराडसीम येथे हिवाळी शिबिर

भुसावळ- आपल्या जीवनातील आवश्यकता वाढविल्यास त्या पूर्ण करण्याची जिद्द निर्माण होते परंतु इच्छा पूर्ण करण्यावर भर दिल्यास त्या अजून वाढतच राहतात. कारण आवश्यकता या शरीराशी संबंधित तर इच्छा या मनाशी संबंधित असतात. त्यासाठी आपल्याला स्वतःची प्रगती करायची असेल तर आवश्यकता वाढवून इच्छांवर नियंत्रण ठेवायला हवे, असे प्रतिपादन बालभारती अभ्यास मंडळ सदस्य तथा द.शि.विद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी केले. भुसावळ येथील पु. ओं. नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिरात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हे हिवाळी शिबिर तालुक्यातील वराडसीम येथील पंडित नेहरू विद्यालयात सुरू आहे. ‘क्षमताधिष्ठित कौशल्यांचा विकास’ या विषयावर डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला.

यांची होती शिबिराला उपस्थिती
डॉ.पाटील यांचा परीचय जयश्री दुबोले हिने करून दिला. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम.सोनवणे, प्रा.एल.डी.धांडे, प्रा.एम.पी.वारके, एम.पी.चौधरी, प्रा.एम.एल.गोसावी, प्रा.टी.एल.चौधरी, प्रा.आर.एन.तडवी उपस्थित होते. डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, क्षमताधिष्ठित कौशल्यांचा विकास करून घेण्यासाठी आधी स्वत:मध्ये असलेल्या क्षमता व कौशल्य यांची ओळख करून घेणे गरजेचे आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आर्थिक क्षमता आणि जीवन कौशल्य व कृती कौशल्य यांच्या माध्यमातून स्वविकास साधायचा असेल तर परंपरेत नवता आणली पाहिजे, बुद्धिमत्ता व बलदंड शरीराचे योग्य वापर केला पाहिजे, दहा बोटांचे शिक्षण घेतले पाहिजे, सोशल मिडियाचा सदुपयोग करावा तर पंचज्ञानेंद्रियांचा गैरवापर टाळावा. क्षमताधिष्ठित कौशल्यांचा विकास केल्याने स्वतःमधील गुणवैशिष्ट्यांचे माहिती करून घेण्यास मदत होते. ताणतणावरहित जीवन जगण्यास आपण सक्षम होतो. जीवन सुखी व समृद्धतेसाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण होते. परिसरातील घटकांशी समन्वय साधून समस्या निराकरण करता येते आणि स्वतःचा भावनिक, वैचारीक व सामाजिक विकासही साधण्यासाठी त्याची मदत होते, असेही डॉ. पाटील यांनी आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात सांगितले. सूत्रसंचालन तनिष भोसले याने तर आभार प्रांजली वाणी हिने मानले. व्याख्यानाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Copy