प्रकृती खालावलेली असतानाही एकनाथराव खडसे ईडीच्या चौकशीसाठी हजर

मुंबई – भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथराव खडसे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसेंची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. मात्र, ते मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. राजकिय कारणास्तव जाणीवपूर्वक ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयानं
गुरुवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश एकनाथराव खडसेंना देण्यात आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन, एकनाथराव खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आजची पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. अशातच एकनाथराव खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना ईडी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. चौकशी दरम्यान पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, ते कार्यालयात हजर झाले आहेत.

मी नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे : खडसे

“ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे आणि नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचे सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयाडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावं त्यानंतर हा प्रश्न राहणार नाही,” असे खडसे यांनी म्हटले. “मुळात खाजगी व्यवहार असल्याचे याची आधी ५ वेळा चौकशी झाली आहे. आता ५ वर्षानंतर पुन्हा ईडीच्या माध्यमातून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. मी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरच ही प्रक्रिया सुरु झाली. मला हेतुबद्दल शंका आहे. राजकीय हेतुने हे सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे,” असे खडसे म्हणाले.

Copy