पोलीस पाटील अलर्ट पाहिजे

0

जळगाव । जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकींमध्ये गण आणि गटांमध्ये गाव केंद्रस्थानी असणार आहे. यामूळे ग्राम पातळीवरील दुवा असलेल्या पोलीस पाटलांना कायदासुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी आपल्या गावात कोण गुन्हेगार व गुंडगिरी वृत्तीची व्यक्ती आहेतर त्यांची माहिती घेवून पोलीसांना द्यावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस पाटलाने अलर्ट रहायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी पोलीस पाटील
कार्यशाळेत केले.

पोलीस मुख्यालय आवारातील मंगलम सभागृहात झालेल्या पोलीस पोलीस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्ह्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यशाळेची सुरूवात उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. केतन ढाके, डीवायएसपी केशव पातोंडे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी एम.एन.जोशी, डीवायएसपी (गृह) महारु पाटील, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन उपस्थित होते. तसेच प्रांतीक अध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष मोहन मेढे, विलास पाटील, उल्हास लांडगे, दिनेश पाटील, भाऊसाहेब पाटील, शरद पाटील, गोपाल पाटील, अशोक पाटील, अर्चना मोरे, रुपाली भोलाणकर, शारदा पाटील, कविता पाटील ह्या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यशाळेत पोलीस पाटलांनी उत्फुर्त सहभाग नोंदविला.

चांगले काम करण्यार्‍यांच्या पाठीशी पोलीस प्रशासन
अध्यक्षीय मनोगतामध्ये मार्गदर्शन करतांना पोलीस अधिक्षक डॉ. जे.डी.सुपेकर म्हणाले की, येणार्‍या निवडणूकींच्या पार्श्‍वभुमीवर गावातील त्रासदायक व्यक्ती, फलक, पुतळा यांची माहिती गावातील पोलीस पाटलांनी पोलीस अधिकार्‍यांप्रमाणे गोळा करण्याच्या सुचना डॉ. सुपेकर यांनी दिल्या. जिल्हा संवेदनशिल असल्याने गावपातळीवर प्रयत्न झाले पाहिजे. गाव सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पाटलांनी पुढाकार घेतला असून ही कौतुकास्पद बाब आहे. परंतू आणखी काही पोलीसांनी आपल्या गावासाठी सीसीटीव्ही नियंत्रणात गाव आणण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्वतःचे चारित्र्य सांभाळून काम करणे महत्वाचे असून त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही असे सांगत चांगले काम करणार्‍या पोलीस पाटलांच्या मागे पोलीस दल असल्याचे डॉ.सुपेकर म्हणाले. सुत्रसंचलन पोशि. शरद पाटील यांनी केले.

पोलीस पाटील मानाचा पद
जिल्ह्यात काही पोलीस पाटीलांची कामगिरी चांगली आहे तर काही पोलीस पाटलांची गुंडगिरी प्रवृत्ति असल्याची तक्रार ऐकण्यास मिळत आहेत. पोलीस पाटील मानाचा पद असून तुम्हाला चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली असून त्या संधीच सोन करत पोलीस प्रशासनाला मदत करावी असे यावेळी डॉ. सुपेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. दरम्यान, दादागिरी, गुंडगिरी करणार्‍यांच्या माहिती जमा करून त्या पोलीसांना द्या, त्यावर तात्काळ करवाई करू, तुम्हाला काही अडचणी आल्यास पोलीस प्रशासनाला कळावा त्याबाबत प्रशासनातर्फे सहकार्य मिळेल अशी ग्वाहीही डॉ. सुपेकर
यांनी दिली.

दैनंदीन डायरी ठेवावी
पोलीस पाटलांना न्यायालयीन कामकाजात येणार्‍या अडचणींमध्ये पोलीस पाटलांची भुमिका यावर जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. केतन ढाके यांनी मार्गदर्शक केले. यात अ‍ॅड. ढाके यांनी एखाद्या संशयित गुन्हा करून पोलीस पाटलांकडे आल्यावर त्याचे जबाब गावातील प्रतिष्ठीत नागरीकांसमोर घेणे महत्वाचे आहे. जेणे करुन न्यायालयात गुन्हा सिध्द करण्याच्या वेळेस त्यांचे जबाब कामा येत असल्याचे अ‍ॅड. ढाके यांनी विषद केले. यातच एकाचा गुन्हेगार गुन्हा करून तुमच्याकडे आल्यानंतर त्याची विचारपूस तसेच त्याला वागणूक कशी द्यावी याबाबतही ढाके यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. तर पोलीस पाटील हा मानाचा व्यक्ती असतो त्यामुळे पदाचा अभिमान ठेवून काम केले पाहिले असे त्यांनी सांगितले.

पोलीस पाटलांचा गौरव
या स्पर्धेत रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील दिपाली बाबुराव तायडे, वसंत जगन लोखंडे (चिंचोलपिंप्री ता. जामनेर), पंकज पंडीत बेंडाळे (विवरे बु. ता. रावेर), दिपक तुकाराम चौधरी (दसनुर ता. रावेर), भिमसिंग लक्ष्मसिंग परदेशी (गाडेगाव ता. जामनेर), शरयु गणेश चौधरी (रवंजे बु. ता. एरंडोल), दगडू सोमपूरी गोसावी (वरखेडी बु. ता.पाचोरा), प्रदीप ब्रिजकिशोर तिवारी (रा. उत्राण, ता. एरंडोल) यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याने त्यांना गौरविण्यात आले.