पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सावद्यात पोलीस अंमलदार कक्षाचा शुभारंभ

सावदा : सावदा येथील पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अंमलदार यांना त्यांचे काम सुव्यवस्थित करीता येण्यासाठी येथील जनतेच्या सहकार्याने पोलीस अंमलदार कक्षाची उभारणी करण्यात आली. या कक्षाचा शुभारंभ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सावदा पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक आर.डी.पवार, तसेच ज्यांनी या कक्षाचे उभारणीस मदत केली असे किशोर पाटील (मोठा वाघोदा) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

पोलीस वसाहतींचा प्रश्‍न मार्गी लावणार
सावदासह इतर ठिकाणी पोलीस वसाहतींबाबत माध्यमांनी विचारणा केली असता पोलीस अधीक्षक म्हणाले की, लवकरच कोरोना परीस्थिती सुधारल्यावर हा प्रश्‍न मार्गी लावू, असेही ते म्हणाले. अपूर्ण पोलीस बळा बाबतीत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सुमारे अडीच वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही ती लवकरच होईल व अधिकची पोलीस कुमक उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.