पोलीस अधीक्षकांचा नियोजनबद्द चक्रव्यूह अन् ‘ऑपरेशन बांगर’ मोहिम फत्ते

0

जळगाव : अकोला जिल्ह्यात पायी जाणार्‍या कुटुंबातील 13 वर्षाच्या मुलीला पळविणाच्या गुन्ह्यात फरार झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून सराईत गुन्हेगार गणेश सखाराम बांगर (32, रा.मालेगाव, जि.वाशिम) हा जळगाव पोलिसांना चकवा देत होता. कुठल्याही परिस्थितीत बांगर याला अटक करावी यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी चंग बांधला. त्यासाठी सहा पथके तर रवाना केलीच शिवाय अधीक्षक डॉ. उगले यांनी स्वत:च इतर जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून बांगरला अडकविण्यासाठी चक्रव्यूह रचला. या नियोजनबध्द चक्रव्हुवमध्ये गणेश बांगर हा सोमवारी दुपारी अडकला. अन् ऑपरेशन बांगर ही मोहिम फत्ते झाली. बांगर याला नाशिक पोलिसांनी पकडले असले तरी त्यात जिल्हा पोलीस दलाचा खारीचा वाटा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बांगर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द मुर्तीजापूर, नशिराबादसह इतर पोलीस ठाण्यात अपहरण, चोरी व विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. गणेश हा त्याची परिचारिका असलेली त्याची प्रेयसी व नातेवाईक यांच्या संपर्कात होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी रवाना करण्यात आलेली पथके, तसेच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व नशिराबादचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे हे गणेशच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. नाशिक जिल्ह्यातील त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला. तेथून तो मालेगाव या त्याच्या मुळ गावी पोहचला. तेथून कांरजा, नंतर बुलढाणा जिल्ह्यतील अंजणी, सुलतानपुर, नेवासा फाटा, हिवरगाव पावसा, मार्गे पुन्हा सिन्नरकडे वळला. रविवारी दुपारपासून त्याच्या हालचाली गतिमान झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी तात्काळ नाशिक शहरचे पोलीस उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला. बांगरचे फोटो, वर्णन, दुचाकी व इतर तांत्रिक माहिती पुरविल्यानंतर सोमवारी दुपारी ‘ऑपरेशन बांगर’ फत्ते झाले.

या पथकातील कर्मचार्‍यांचीही महत्वाची भूमिका
स्थानिक गुन्हे शाखेचे विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर यांच्यासह उपनिरीक्षक संदीप पाटील, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, अशोक पाटील, दुसरे पथक सहायक निरीक्षक स्वप्नील नाईक, रवींद्र पाटील, कमलाकर बागुल, दीपक पाटील, मुरलीधर बारी, तिसरे पथक उपनिरीक्षक सुधाकर लहारे, संजय हिवरकर, राजेश मेढे, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, इद्रीस पठाण, चौथे पथक राजेंद्र पाटील, अनिल इंगळे, रमेश चौधरी, संतोष मायकल, प्रवीण हिवराळे यांचे तर पाचवे पथक सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख, राजेंद्र पवार व सहाव्या पथकात सायबरचे उपनिरीक्षक अंगद नेमाने, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले व श्रीकांत चव्हाण यांचे होते. या सर्व पथकांचीही बांगरला अटक करण्यात मोलाची कामगिरी आहे.

पोलीस कोठडीचा हक्क राखून कारागृहात रवानगी


अल्पवयीन मुलीला पळविल्याच्या गुन्ह्यात गणेश सखाराम बांगर (32, रा.मालेगाव, जि.वाशिम) याला सोमवारी दुपारी नाशिकला पकडण्यात आले. रात्री त्याला उशिरा जळगावात आणण्यात आले. चौकशीअंती त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन मुलीशी गैरप्रकार केलेला नाही, मात्र त्या उद्देशानेच तिला पळवून नेल्याने या गुन्ह्यात त्याच्याविरुध्द बाललैंगिक अत्याचाराचे (पोस्को)वाढीव कलम लावण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासाधिकारी गजानन राठोड यांनी बांगर याला न्यायालयात हजर करण्यात आले. व पोलिसांनी पोलीस कोठडीचा हक्क राखून पोलीस कोठडीची विनंती केली होती. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी त्या अनुषंगानेच युक्तीवाद करुन त्यामागची कारणे न्यायालयालया पटवून सांगितली. जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी त्याची पोलीस कोठडीचा हक्क राखून कारागृहात रवानगी केली. या काळात मुलीकडून आरोपीची ओळख परेड होणार आहे.