पोलिस अधीक्षकांनी घेतला सिव्हीलच्या सुरक्षेचा आढावा

0

जळगाव। जिल्हा शासकीय रूग्णालयात अंतर्गत सुरक्षितेच्या दृष्टीने काय उपाययोजना आहे, हे जाणून घेण्यासाठी शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांनी सिव्हीलला भेट देऊन एकूण परिस्थिती जाणून घेत आढावा घेतला. सिव्हील परिसरात प्रशस्त जागा दिल्यास येथे चांगल्या पध्दतीची पोलीस चौकीची निर्मिती करता येईल,असे सुतोवाच पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी या भेटीदरम्यान केले.रूग्ण तसेच कर्मचार्‍यांच्यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेबाबत आढावा घेण्यासाठी त्यांनी आज सिव्हीलसर्जन डॉ. भामरे, प्रभारी सिव्हील सर्जन डॉ. किरण पाटील यांची भेट घेऊन माहिती घेतली. खासगी सुरक्षा गार्ड नेमले का? सीसीटीव्ही कॅमेरे बसविले का? इत्यादी प्रश्न उपस्थित करून माहिती घेतली.

पोलिस चौकीत कामकाजासाठी कर्मचारी वाढणार
डॉ. किरण पाटील यांनी उत्तरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे त्यांनी सांगीतले. खासगी सिक्यूरीटी एजन्सी कर्मचार्‍यांची सुपरव्हिजन करतो का? सिक्यूरिटी कर्मचार्‍यांना आढावा घेतला जातो का? असे प्रश्न करून डॉ. सुपेकर म्हणाले, केवळ एजन्सी नेमले म्हणून कामकाज होत नाही. यासाठी चांगली एजन्सीकडून कर्मचारी घ्यायला हवीत, अशी सुचना त्यांनी केली. याकामी पोलीस प्रशासन सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिव्हीलच्या सुरक्षेसाठी चांगली पोलीस चौकी असण्याची गरज आहे. त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यायला हवी. त्याठिकाणी पाणी, विज ही सोय असायला हवी. यामुळे पोलीस स्टॉफही पुरेसा उपलब्ध राहील, असे पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर म्हणाले.यावेळी त्यांच्या सोबत डीवायएसपी सचिन सांगळे होते. सध्या सिव्हीलमध्ये कार्यान्वीत असलेल्या पोलीस चौकीचे नुतनीकरण केले जाणार आहे. तेथे खुच्र्या, कॉट इत्यादी सुविधा उपलब्ध केली जाईल. सध्या या चौकीत दोन शिफ्टमध्ये कामकाज चालते. तर दोन पोलीस कर्मचारी व एक महिला कर्मचारी असे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यापुढे चार पोलीस कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी चौकीत कामकाज पाहतील, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.