पोलिसाच्या हाताला झटका देवून जिल्हा रुग्णालयातून कैद्याचे पलायन

0

औषधोपचारासाठी आणले होते जिल्हा रुग्णालयात ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव : कारागृहात औषध उपचारासाठी आणलेल्या मुबारक नबाब तडवी (वय 25 मुळ रा. वड्री परसाळा ता. यावल) या कैद्याने पोलिसाच्या हाताला झटका देत जिल्हा रुग्णालयातून पलायन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयात कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. दरम्यान हा कैदी दोन दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडीत कारागृहात दाखल झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

ड्रेसिंगनंतर बाहेर पडताच केले पयालयन
पोलीस नाईक शेख मुसा शेख ईसा (50) हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. शेख ईसा यांच्यासह सहाय्यक फौजदार गफ्फार अदिल शेख यांना शनिवारी गार्ड ड्युटी होती. पोलीस मुख्यालयातील स्टेशन डायरीला नोंद करून दोघा कर्मचार्‍यांनी शनिवारी सकाळी 10.30 वाजता कारागृहातील कैदी मुबारक नबाब तडवी (25) तसेच कैदी वैभव गोपाळ गवळी रा. बारीवाडा चोपडा यांना ताब्यात घेतले. शासकीय वाहनाने दोघांना 11 वाजता बंदोबस्तात औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्लयानुसार पोलीस नाईक शेख यांनी मुबारक तडवी यास पोटाला ड्रेसींग करण्याकामी जिल्हा रुग्णालयातील रूम नं. 110 नेले. तर सहाय्यक फौजदार गफ्फार शेख यांनी त्यांच्या ताब्यातील वैभव गवळी याला ईसीजी तपासणी करण्याकामी घेऊन गेले. ड्रेसिंगनंतर कर्मचारी शेख हे कैदी मुबारक तडवी घेवून जात असतांना त्याने रूग्णालयातील गर्दीचा फायदा घेत हातातील बेडी काढून पळ काढला. शेख यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत तडवी पसार झाला होता.

फसवणुकीच्या गुन्ह्यात 19 रोजी आला कारागृहात
मुबारक तडवी याच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतः वार करुन जखमी केले होते. यानंतर उपचारानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर यावल न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानुसार 19 रोजी तडवी हा जिल्हा कारागृहात आला आला असल्याची माहिती मिळाली आहे. पळून गेल्याप्रकरणी पोलीस नाईक शेख मुसा शेख ईसा याच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भाग 5 गुरन 220/19 भादवी कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy