पोलिसांवर दहशतवादी हल्ला; कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा

0

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री पोलिस दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका पोलिसासह पाचजण ठार झालेत. तर लष्कर-ए-तोयबाच्या एका कुख्यात दहशतवाद्यासह त्याच्या काही साथीदारांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्याचे फैय्याज अहमद अश्‍वर उर्फ सेठा असे नाव आहे. त्याने सुरक्षा यंत्रणांवर सातत्याने हल्ले चढवले होते. ऑगस्ट 2015पासून तो बेपत्ता होता. दिवसभर सुरक्षा यंत्रणांनी सर्च ऑपरेशन राबविले.

फैय्याज अश्‍वरवर होता दोन लाखांचा इनाम
दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला चढविल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्याच्याआधीच पोलिस कॉन्स्टेबल महमूद अहमद शेख यांनी जीव धोक्यात घालून एका दहशतवाद्याची पिस्तुल हिसकावून घेतली होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात शेख हे शहीद झालेत. या गोळीबारात अन्य तीन नागरिकदेखील ठार झालेत. या दहशतवाद्यांशी उडालेल्या धुमश्‍चक्रीत फैय्याज या कुख्यात दहशतवाद्यासह अन्य काही जणांचा खात्मा करण्यात यश आले. पोलिस दल हे एका रस्ता दुर्घटनेची पाहणी करण्याकरिता मीर बाजार भागात गेले होते. तेव्हा हा हल्ला झाला. धुमश्‍चक्रीत जखमी दहशतवाद्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फैय्याज अश्‍वर याच्यावर सुरक्षा यंत्रणांनी यापूर्वीच दोन लाख रुपयांचा इनाम जाहीर केलेला होता. उधमपूर हल्लाप्रकरणी एनआयएने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेले आहे.

फैय्याजला दहशतवाद्यांची सलामी
चकमकीत ठार मारण्यात आलेल्या फैय्याज अश्‍वर याला त्याच्या साथीदारांनी एके-47 असॉल्ट रायफल्सद्वारे हवेत दोनवेळा गोळीबार करून सलामी देण्यात आली. त्याच्या अंत्यसंस्कारप्रसंगी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. अंत्यविधी सुरु असतानाही अचानक काही दहशतवादी तेथे आले व त्यांनी हवेत गोळीबार सुरु केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. महिला व लहान मुलांची एकच पळापळ उडाली. त्यानंतर हे दहशतवादी निघून गेले. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी जोरदार सर्च ऑपरेशन हाती घेतले होते.