Private Advt

पोपटानी यांचे आरोप निराधार महावितरणचे स्पष्टीकरण

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीतील वीजग्राहक पोपटानी यांचा वीजपुरवठा वीजबिलाच्या थकबाकीमुळे नियमानुसार खंडित केलेला आहे. तसेच वीज मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे गोपाल पोपटानी यांच्यावर यापूर्वी वीजचोरीचा गुन्हा करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोपटानी कुटुंबीयांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे, महावितरणची बदनामी करणारे व जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

23 डिसेंबर रोजी पॉवर हाऊस शाखेचे सहायक अभियंता जयेश तिवारी, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे, तंत्रज्ञ नमो सोनकांबळे, कनिष्ठ कार्यालयीन सहायक योगेश जाधव, कंत्राटी कर्मचारी गुणेश ननवरे हे वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी, बाबानगर भागात गेले होते. त्यावेळी वीजबिल न भरलेल्या ग्राहकांना सूचना दिल्याने त्यातील काहींनी बिलाचे पैसे भरले. ज्यांनी बिल भरले नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तेथील एक ग्राहक टिकमदास परमानंद पोपटानी यांनी 75 दिवसांपासून बिल भरलेले नाही. महावितरण कर्मचाऱ्यांनी पोपटानी यांना आवाज देऊन घराबाहेर बोलवले व त्यांना वीजबिल भरून सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र यावेळी किशोर पोपटानी यांनी अचानक महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हातातील टिकाव अभियंता तिवारींच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून पोपटानींच्या हातातून टिकाव हिसकावला. पोपटानींनी कर्मचाऱ्यांशी झटापट करून त्यांना मारहाण केली. या प्रकारात तिवारी व योगेश जाधव यांच्या डाव्या कानाला तसेच नमो सोनकांबळे यांना पाठीला मार लागला. तसेच पोपटानींनी दगड उचलून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. महावितरणचे कर्मचारी शासकीय कर्तव्य पार पाडताना पोपटानींनी त्यात अडथळा आणून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत किशोर पोपटानींवर त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर 25 डिसेंबर रोजी गोपाल पोपटानी तसेच किशोर पोपटानींच्या पत्नीने पत्रकार परिषदेत महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांवर बिनबुडाचे व धादांत खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली. महावितरणने स्पष्ट केले आहे की, पोपटानी यांच्यावर नियमानुसारच वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे. सहायक अभियंता तिवारी यांनी कोणत्याही महिलेस धक्काबुक्की अथवा गैरवर्तन केलेले नाही. 75 दिवसांपासून थकीत असलेले वीजबिल भरण्याची विनंती केल्यावर किशोर पोपटानींनी अभियंता व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी संबंधित रोहित्र तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामागे इतर कोणताही उद्देश नव्हता. ज्या गोपाल टिकमदास पोपटानींनी पत्रकार परिषदेत महावितरण व कर्मचाऱ्यांची बदनामी केली, त्यांच्यावर वीज मीटर बायपास करून 78 हजार 140 रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा 20 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. यावरून पोपटानींची वीजचोरी करण्याची व वीजबिल न भरण्याची पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पोपटानींनी आकसबुद्धीने व पूर्वग्रह बाळगत पत्रकार परिषद घेऊन महावितरणची बदनामी व सामान्य जनतेची दिशाभूल केली आहे, असे महावितरणने म्हटले आहे.