पोटच्याच मुलीला दिले उलथणीचे चटके

0

जळगाव : पाचोरा तालुक्यातील बांबरूड येथील अश्विनी बापूराव पाटील (वय 26) हीचे पतीशी पटत नसल्याने दोन वर्षापासून एमआयडीसी परिसरात राहत होती. दोन महिन्यापासून ती रामेश्वर कॉलनीतील मंगलसिंग कापरसिंग पवार यांच्या घरात भाड्याने राहत असून तिच्या सोबत पूजा (वय 7) आणि प्रमोद बीडकर हे राहतात. मात्र, पोटच्या मुलीला अश्‍विनी ही प्रमोद सोबत मिळून उलथणीचे चटके देत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. हा प्रकार शिवसेनेच्या महिला आघाडीस कळताच त्यांनी चिमुकलीच्या आईची धुलाई करून पोलीसांच्या ताब्यात दिले तर प्रमोद याला पोलीस ठाण्यात तोंडाला काळे फासत चोप दिला.

आईने चटके देताच पुजा व्हिळतं पळाली गल्लीत
अश्‍विनीने मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास अगोदर पूजाला मारहाण केली. त्यानंतर 12.30 वाजेच्या सुमारास अश्विनीने तिला धरून ठेवले तर प्रमोद याने उलथण्याने तिच्या हातावर चटके दिले. एवढ्यावर न थांबात निष्ठूर अश्विनीनेही चटके दिले. त्यामुळे पुजा व्हिळतं गल्लीत पळत होती. तिला पकडण्यासाठी दोघे तिच्या मागे धावत होते. हा सर्व प्रकार गल्लीतील नागरीकांनी बघितला. रामेश्वर कॉलनीतील महिलांनी गुरूवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मनिषा पाटील, सुनिता भालेराव, विमल वाणी, निर्मला चौधरी यांना या घटनेच्या संदर्भात सांगितले. त्यांनी येऊन पुजाला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्यावर डॉ. राजेश सुरळकर यांच्याकडे घेऊन जाऊन उपचार केले.

तोंडाला फासले काळे…
संतप्त झालेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी अश्‍विनीचे घर गाठले. त्यावेळी अश्विनी आणि तिची बहीण मुक्ता पाटील या दोन्ही आजुबाजुच्या महिलांना शिविगाळ करून मुलगी परत देण्याच्या धमकी देत होत्या. महिला आघाडीच्या सदस्यांनी पोहोचल्यावरही त्यांनी ते सुरू ठेवले. संतप्त झालेल्या महिलांनी दोन्ही बहिणींची चांगलीच धुलाई करून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. महिला आघाडीच्या सदस्यांनी अश्‍विनीला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर प्रमोद बीडकर याला फोनकरून बोलवण्यास सांगितले. तो पोलिस ठाण्यात आल्यानंतर संतप्त महिलांनी त्याच्या तोंडाला काळे फासून चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.