पेपर फुटल्याने देशभरातील लष्कराची परीक्षा रद्द

0

18 आरोपींसह 350 जणांना ताब्यात घेतले

पुणे : सुंपर्ण देशात रविवारी लष्कर भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार होती. पेपर फुटल्यामुळे लष्कर भरतीची ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शनिवारी संध्याकाळी पेपर फुटल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री उशीरा महाराष्ट्र आणि गोव्यात छापेमारी करून पोलिसांनी 18 आरोपींसह तब्बल 350 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. नागपूर, अहमदाबाद, गोवा, खडकी आणि अन्य ठिकाणी होणारी लष्कर भरती परीक्षा रद्द झाल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.

लॉजमध्ये पेपर लिहिताना पोलिसांचा छापा
क्लर्क, स्ट्राँगमन, ट्रेड्समन या पदांसाठी देशभरातील 52 केंद्रांवर रविवारी ही परीक्षा घेतली जाणार होती. लष्करी भरतीचे कोचिंग क्लास चालवणार्‍या काहीजणांनी परीक्षेपुर्वी विद्यार्थ्यांना पेपर दिल्याचे पोलिसांनी सांगीतले. काही विद्यार्थ्यांना तर हॉटेल व लॉजमध्ये पेपर लिहित असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये लष्करी अधिकार्‍यांचेही संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुण्यातून आठजण ताब्यात
पुण्यातील हडपसरमधून या प्रकरणी दोन जण अटकेत असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हडपसर, पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांनी 70 जणांना प्रत्येकी तीन लाख रुपयांत पेपर वाटल्याची माहिती आहे. रात्रीपासून आलेले ठाणे पोलिसांचे पथक हडपसर पोलिस स्टेशनमध्ये दिवसभर तपास करत होते. अटकेतील व ताब्यातील अशा सर्व आठजणांची कसून चौकशी सुरु आहे. मुख्य आरोपी धनाजी जाधव याची फलटण येथे स्वत:ची ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी आहे. काही दलालांनी विद्यार्थ्यांना या भरती परीक्षेचे पेपर मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. मात्र त्याआधीच पोलिसांनी धाड टाकून अनेकांना ताब्यात घेतले.

नागपुरातही कारवाई
नागपूरच्या पार्वती नगर येथील मौर्य सभागृहातून पहाटे 4 वाजताच्या सुमारास ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. सैन्य भरतीच्या पेपरसाठी आदल्या दिवशी अनेक विद्यार्थी नागपुरात आले होते. त्यापैकी सुमारे 60 विद्यार्थी मौर्य सभागृहात थांबले होते.