पेन आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे भारतातील पहिले संमेलन रंगले आकुर्डीत

0
पेन काँग्रेसच्या संमेलनात स्पेन, स्लोव्हेकिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी आदी देशांमधील लेखकांचा सहभाग
विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाच्या वादनाने लेखक भारावले
आकुर्डी : जगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन आंतरराष्ट्रीय काँग्रेस’ या संस्थेचे संमेलन पेन साऊथ इंडिया सेंटरच्यावतीने 84 व्या आंतरराष्ट्रीय पेन काँग्रेसचे आयोजन पहिल्यांदाच पुण्यात झाले. दि. 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या चार दिवसाच्या परिषदेमध्ये पुणे विद्यापीठातील काही निवडक महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यात आकुर्डी येथील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाची निवड करण्यात आली. आकुर्डी येथील महाविद्यालयात झालेल्या पेन काँग्रेसच्या संमेलनात स्पेन, स्लोव्हेकिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, भारत व द पिपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या 7 लेखकांनी आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला भेट दिली. ढोलपथकातील विद्यार्थ्यांच्या दिमाखदार सलामीने ज्येष्ठ लेखक व प्रेक्षकवर्ग भारावून गेले. महाविद्यालयाच्या एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी लेखकांचे स्वागत केले. फ्लॅशमॉबच्या नृत्यविष्काराने पाहुण्यांना सुखद धक्का दिला. यावेळी प्राचार्य डॉ.मनोहर चासकर,  उपप्राचार्य डॉ.तुषार शितोळे, उपप्राचार्य डॉ.अभय खंडागळे, रजिस्ट्रार अनिल शिंदे, इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ.मंजुषा धुमाळ, समन्वयक डॉ.शिल्पागौरी गणपुले आदी उपस्थित होते.
सुरुवातीला पेन या संस्थेबाबत माहिती देण्यात आली. पेन इंटरनॅशनल ही 98 वर्षे सातत्याने कार्यरत असणारी वैश्‍विक पातळीवरची एकमेव आणि जगविख्यात संस्था आहे. लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवणे, साहित्यिक, प्रकाशक, पत्रकार यांचे खून होत असतील, त्यांचा छळ होत असेल तर ते रोखण्यासाठी आघाडी उघडणे, ग्लोबल साऊथमधल्या देशातील साहित्यिकांना व्हिझिबिलिटी मिळवून देणे, भाषांतर संस्कृती वाढवणे, नागरिकांचे भाषा अधिकार जोपासणे, त्यांचे रक्षण करणे, इत्यादी अवघड कामे केली जातात. अशी कामे केवळ साहित्य संमेलने अथवा साहित्य मेळे भागविणार्‍या संस्था करू शकत नाहीत. पेन इंटरनॅशनल संस्था अशी कामे करत आली आहे. या संस्थेची 180 हुन जास्त ‘पेन केंद्रे’ जवळपास 120 देशात पसरली आहेत.  आपल्या देशात अशी तीन केंद्रे आहेत. पेनच्या संपूर्ण इतिहासात, पेन काँग्रेसचे एकही अधिवेशन भारतात साजरे झाले नाही. या वर्षी ते होत आहे, ही आपल्या देशातील सगळ्या साहित्यिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
परिसंवादात मांडली मते
राँदेवु विथ पेन परिसंवाद झाला. यामध्ये प्रत्येक कवी, भाषांतरकार, इतिहासकार, निबंधकार आदींनी आपली साहित्य, समाज, संस्कृती, तंत्रज्ञान याबाबतीतील मते मांडली. साहित्य समाजाशी असलेले नाते या परिसंवादात उलगडण्यात आले. समाजाच्या उभारणीसाठी सकारात्मक बदल घडून आणू या. यामध्ये केली फ्लाईइनर (ऑस्ट्रेलिया), रॉबर्ट वूड (ऑस्ट्रेलिया), सिमोना, स्पेन, कार्लोस सियेईल (जर्मनी), अ‍ॅना योलाँक (स्पेन), मलिक डिएरा (फ्रान्स), मधु सिंग (पिपल्स लिंगविस्टीक सर्वे ऑफ इंडिया, लखनऊ विद्यापीठातील प्राध्यापिका) यांनी सहभाग घेतला. विभागप्रमुख डॉ.मंजुषा धुमाळ व कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ.शिल्पागौरी गणपुले यांनी परिसंवादात रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मंजुषा धुमाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रुपल वाघमारे व डॉ.आशुतोष ठाकरे यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Copy