पेट्रोल, डिझेलचे दर दररोज बदलणार?

0

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार्‍या पेट्रोलियम कंपन्यांकडून आता प्रत्येक दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक घडामोडी आणि त्याचे खनिज तेलाच्या दरावर होणारे परिणाम याचा अभ्यास करुन इंधनाचे दर दररोज बदलता येण्याबद्दल सरकारच्या अखत्यारित येणार्‍या कंपन्यांकडून विचार सुरु आहे. असे घडल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल होऊ शकतो. देशभरातील 90 टक्के इंधन बाजारावर केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार्‍या कंपन्यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे याचे मोठे आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलल्यास त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होणार आहे.

सध्या दर पंधरा दिवसांनी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरांमध्ये बदल केले जातात. जागतिक बाजारपेठेतील इंधनाचे दर आणि जागतिक स्तरावरील घडामोडी विचारात घेऊन दर पंधरा दिवसांनी पेट्रोलियम कंपन्यांकडून दरांमध्ये बदल केले जातात. मात्र दर पंधरा दिवसानंतर घेण्यात येणारा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलांच्या किमतींचा आढावा आता दररोज घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या हे धोरण पेट्रोलियम कंपन्यांकडून विचाराधीन आहे. हे धोरण लागू करण्यात आल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दर पंधरा दिवसांनी न बदलता प्रत्येक दिवशी बदलतील.

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार्‍या मात्र स्वायत्तता असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन त्या बदलण्यासाठीचे धोरण विचाराधीन आहे. याबद्दल अद्याप पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये दररोज होणार्‍या बदलाला डायनामिक फ्युईल प्राईसिंग म्हटले जाते. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर लक्षात घेऊन त्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जातील. यामुळे भारतातील इंधन दर रचना आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधन दर रचनेच्या स्तरावर जाणार आहे.