पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल

0

नंदुरबार। तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल केली जात असल्याची तक्रार राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. याबाबत पक्षाचे विभागीय सदस्य दिलीप ढाकणे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश सुळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुष्पा थोरात यांनी जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेठ्ठी यांची भेट घेवून तक्रारी निवेदन सादर केले.

जंगलातील पशू प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात
त्यात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील खोक्राणे, आसाणे, वैदाणे, वलवंड, तलवाड या भागात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू झाली आहे. त्यामुळे हा परिसर बोडखा होत असून भविष्यात पर्यावरणाला घातक ठरणार आहे. सरकारी जागेवर असलेल्या झाडांची खुलेआम तोड होत असल्याने जंगलातील पशू प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासन एकीकडे झाडे लावा, झाडे जगवाच्या घोषणा करीत आहे. तर दुसरीकडे सरकारी जमिनीवरील झाडांची कत्तल केली जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला असला तरी जीवंत झाडे तोडली जात असल्याने वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला जात आहे. नंदुरबार विभागाच्या पूर्व भागात होत असलेल्या वृक्षांच्या कत्तलीबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.