पूजेचे साहित्य विहिरीत टाकताना तोल जावून पडल्याने भालोदच्या विवाहितेचा मृत्यू

0

फैजपूर- यावल तालुक्यातील भालोद येथे भजे गल्लीतील विवाहिता रेखा प्रकाश इंगळे (54) या शुक्रवार, 23 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान पूजेचे निर्माल्य टाकण्यासाठी गावाजवळील विहिरीवर गेल्या असता तोल जावून पडल्याने त्यांचा दुदैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर भालोद गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. भालोद-पिळोदे बु.॥ रस्त्यालगतच्या स्व-मालकीच्या विहिरीत पूजेचे निर्माल्य टाकण्यासाठी सकाळी रेखा इंगळे या गेल्या होत्या. यावेळी गवतावरून पाय सरकल्याने त्यांचा तोल गेला व त्या विहिरीत बुडाल्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, सून असा परीवार आहे. फैजपूर पोलिसात रवींद्र देविदास महाजन यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेनंतर फैजपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, कॉन्स्टेबल रमण सुरळकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. डॉ.फिरोज तडवी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मयत विवाहितेने श्री स्वामीनारायण मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त पूजा केली व पतीसोबत शेतात पूजेचे निर्माल्य टाकण्यासाठी गेल्या असता दुःखद घटना घडली.

Copy