पुस्तकांऐवजी विद्यार्थ्यांना मिळणार पैसे

0

भुसावळ । इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, यापुढील काळात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याऐवजी आता त्या पुस्तकांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झीरो बॅलेन्सची बचत खाती उघडण्यात येणार आहेत. शासनाने यासंदर्भात अध्यादेश काढून विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू स्वरुपात मिळणार्‍या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

आधार कार्ड क्रमांक नोंदवणेही गरजेचे
तसेच या खात्याला संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक जोडण्यात आला आहे. त्यानुसार कल्याणकारी योजनेचा लाभार्थींना लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांची बँकेत खाती नाहीत. शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ त्यांना मिळावा, यासाठी प्रथम बँकेत खाती असणे आवश्यक आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याने आता पुस्तकांऐवजी लाभार्थींच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. शासन किती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बँकेमध्ये विद्यार्थ्यांची खाती काढताना त्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक नोंदवणेही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची बँकेमध्ये खाती उघडण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खाते उघडल्यामुळे एखादा विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सगळी जबाबदारी शिक्षणाधिकार्‍यांची राहणार आहे.