पुसनदचा ग्रामसेवक नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

दोन हजारांची लाच भोवली : लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ

नंदुरबार/भुसावळ : दोन हजारांची लाच घेताना शहादा तालुक्यातील पुसनद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला नंदुरबार एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. उमेश निमसिंग रौंदळे (35, रा.विनोद नगर, देवपूर धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ग्रामसेवकाला भोवली लाच
57 वर्षीय तक्रारदार यांच्या मुलाचे नावे पुसनद ग्रामपंचायत हद्दीत घेतलेल्या घराचे नमुना 8 ‘अ’ चा उतारा हवा असल्याने तो देण्यासाठी आरोपी ग्रामसेवक उमेश रौंदळे यांनी गुरुवारी दोन हजारांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली. आरोपीन रौंदळे यांनी शहादा खरेदी-विक्री कार्यालयाच्या आवारात तक्रारदाराला पैसे देण्यासाठी बोलावल्यानंतर पथकाने सापळा रचला. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या आरोपीने पंचांसमक्ष लाच स्वीकारताच त्यास एसीबीच्या पथकाने अटक केली. धुळ्यातील आरोपीच्या घराची झडतीही घेण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक सतीश भामरे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी समाधान वाघ, पोलिस निरीक्षक समाधान एम.वाघ, हवालदार उत्तम महाजन, हवालदार विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, नाईक दीपक चित्ते, नाईक अमोल मराठे, नाईक देवराम गावीत, महिला नाईक ज्योती पाटील, नाईक संदीप नावडेकर, चालक नाईक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.