पुर्व उपांत्य सामन्यात घाटकोपर मुंबईसह जैन इरिगेशन संघ विजयी

0

भुसावळ । येथील नानासाहेब देविदास फालक स्पोर्टस् अकादमीतर्फे आयोजित ऑल इंडिया टी-20 क्रिकेट टुर्नामेंटमध्ये गुरुवार 16 रोजी दोन पुर्व उपांत्य सामने खेळविण्यात आले. त्यात पहिला सामना एसटी महामंडळ जळगावने जिंकला व प्रथम फलंदाजी करत घाटकोपर मुंबई समोर 159 धावांचे लक्ष्य ठेवले. यात एक गडी ठेवून घाटकोपर संघ विजयी झाला. या सामन्यात सामनावीर म्हणून प्रशांत मारकू यांची निवड करण्यात आली. मारकू यांनी 30 चेंडूत 53 धावा काढल्या. त्यांना डॉ. किशोर पाठक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर दुसरा सामना ईसीसी अमळनेर विरुध्द जैन इरिगेशन जळगाव यांच्यात झाला. यात ईसीसी अमळनेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. परंतु त्यांचा पूर्ण संघ फक्त 89 धावांवर बाद झाला. जैन इरिगेशनने 902 धावांचे लक्ष्य 3 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले व 7 गडी राखून सामना जिंकला. सामनावीर म्हणून राहुल निंभोरे याला निवडण्यात आले. त्याने 4 ओव्हरमध्ये एक निर्धाव ठेवून तीन गडी बाद केले. त्याला डॉ. किशोर पाठक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.