Private Advt

पुरमेपाडा शिवारात पिकअप दुचाकीला धडकला : दोघे तरुण ठार

धुळे : धरणगाव, जि.जळगाव येथील दोघे तरुण धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात झालेल्या अपघातात ठार झाले. भरधाव वेगातील पिकअपने मोटारसायकलला धडक दिल्याने धरणगाव येथील विजय मराठे हे ठार झाले. या अपघाताला काही तास होत नाही तोच पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा अपघात झाला. भरधाव वेगातील रिक्षा उलटल्याने धुळे तालुक्यातील लामकानी येथील रवींद्र पवार ठार झाले. तसेच चार जण जखमी झाले. विशेष म्हणजे मराठे व पवार हे सप्तशृंगी देवीचे दर्शन करून घरी जात असतांना काळाने त्यांच्यावर घाला घातला. दोन्ही अपघातांची धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

अपघातांची मालिका कायम
पुरमेपाडा शिवारातून जाणार्‍या मोटारसायकलवरून (एमएच-19-व्हीव्ही-6399) विजय अण्णा मराठे, अमोल मराठे (दोघे. रा. मराठे गल्ली, धरणगाव, जि. जळगाव) हे जात होते. पुरमेपाडा शिवारात धुळे शहराकडून वेगात येणार्‍या पिकअप व्हॅनने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यानंतर व्हॅन चालकाने पळ काढला. अपघातात अमोल व विजय मराठे गंभीर जखमी झाले. त्यांना हिरे रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू करण्यापूर्वी विजय मराठे यांचा मृत्यू झाला.

पुन्हा घडला अपघात
या अपघाताला काही तास उलटत नाही तोच पुन्हा याच ठिकाणी शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता रीक्षा (एम.एच.18 डी.9065) दुभाजकावर आदळून उलटली. या अपघातात रीक्षा चालक रवींद्र पिरन पवार ( 45, रा. लामकानी, ता. धुळे) हे ठार झाले. तर त्यांच्या पत्नी संगीता पवार, मुले आशिष व चेतन तसेच दिलीप देवीदास देवरे हे जखमी झाले. दोन्ही अपघातांबद्दल धुळे तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक प्रकाश पाटील, कर्मचारी नितीन दिवसे तपास करत आहे.