पुन्हा सर्जिकल स्ट्राईकच हवा

0

पुणे : काश्मीरमध्ये पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून, आपल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबनाही करत आहे. हा सर्वच प्रकार अत्यंत संतापजनक असून, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकसारखी मोठी कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी मंगळवारी जनशक्तिशी बोलताना व्यक्त केले.

माजी हवाईदल प्रमुख एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले म्हणाले, पाकिस्तानला खणखणीत प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रुला कंठस्थान घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, आपण या तंत्रज्ञााचा म्हणावा तेवढा वापर करत नाही. पाकिस्तानी सैन्याने आपल्या जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणे, ही घटना संतापजनक आहे. पठाणकोट येथे हल्ला झाला तेव्हा जवानांच्या सुरक्षेसाठी आणि पाकिस्तानविरूद्ध कारवाईच्या विविध योजना आखल्या गेल्या. पण प्रत्यक्षात त्यातील कोणत्याच उपाययोजना अमलात आणल्या गेल्याचे दिसलेले नाही. एखादा हल्ला झाल्यांनतरच आपण शत्रूला प्रत्युत्तर देतो. ही भूमिका आपण बदलली पाहिजे.

पाकिस्तान ज्या पद्घतीने भारतात घुसखोरी करत आहे, त्याविरूद्ध पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्जिकल स्ट्राईकसारख्या मोठ्या सर्जरीची आता गरज आहे, असे मत मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी व्यक्त केले.

ब्रिगेडिअर (निवृत्त) आर. आर. पळसोकर म्हणाले, पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची गरज आहे. मात्र, आपण अशी कारवाई केल्यानंतर त्याबाबत उगाचच गाजावाजा करता कामा नये. पाकिस्तानने केलेले कृत्य अमानवी असून, त्याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. तसेच, आंतरराष्ट्रीय मंचावरही पाकिस्तानचे धिंडवडे काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.