पुन्हा जगा बालपण, ‘शक्तिमान’ आता अॅमेझॉन प्राइमवर

0

मुंबई : मुकेश खन्नाची मुख्य भूमिका असलेली मालिका आणि टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आणि भारतातला पहिला सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’ आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. शक्तिमान ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकातील मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता. रविवार आला की दुपारचे बारा कधी वाजतील याचीच प्रतिक्षा लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच असायची.

आता पुन्हा एकदा ते दिवस सर्वांना जगायला मिळणार आहे. ‘शक्तिमान’चे दोन सिझन अॅमेझॉन प्राइमवर आले आहेत. ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यावी अशी इच्छा मुकेश खन्ना यांची होती. नव्वदच्या दशकात डीडी नॅशनलवरील ही सर्वाधिक कमावणारी मालिका होती. १३ सप्टेंबर १९९७ ते २७ मार्च २००५ या कालावधीत ही मालिका प्रसारित झाली.

‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्नाने सर्वांची मनं जिंकली होती. ‘कानून का दोस्त, मुर्जिमों का दुश्मन,’ हे शक्तिमानचे तर ‘अंधेरा कायम रहे,’ हे किल्विश या खलनायकाचे संवाद तुफान गाजले. छोट्या पडद्यावर एक मैलाचा दगड ठरलेली ही मालिका ‘अॅमेझॉन प्राइम’च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने ‘शक्तिमान’च्या चाहत्यांना आनंद होणार याची खात्री.

Copy