पुण्यात बेकरीला आग; सहा कामगारांचा गुदमरुन मृत्यू

0

पुणे : शहरातील कोंढवा परिसरातील बेक्स अँड केक्स या बेकरीस पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे, बेकरीत झोपलेल्या सहा कामगारांचा मृत्यू झाला. बेकरीत पसरलेल्या धरामुळे गुदमरून हे सहा कामगार मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात बेकरी मालकासह तिघांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार उत्तर प्रदेशातील आहेत. इर्शाद अयुब खान (वय 26), शहानू नसीम अन्सारी (वय 22), फहीम नसीम अन्सारी (वय 24), शाखीर मुक्तार अन्सारी (वय 23), फिरोज रहीम अन्सारी (वय 25) आणि नाजीम अलाईज जुवेत (वय 21, सर्व मूळ रा. बिजनौर, उत्तर प्रदेश), अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी अब्दुल मोहंमद युसूफ चिन्नीवार (वय 27, कुमार होम्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), तय्यब अन्सारी (वय 26, रा. सय्यदनगर, हडपसर) व मुनीर चिन्नीवार (वय 62, रा. पारगेनगर, कोंढवा) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल चिन्नीवार यांचे कोंढवा परिसरातील तालब चौकात असलेल्या गगन एव्हेन्यू या नऊ मजली गृहप्रकल्पातील गाळ्यात बेक्स अँड केक्स हे दुकान आहे. गेल्या दोन वर्षार्ंपासून ते दुकान चालवतात. तय्यब अन्सारी व मुनीवर चिन्नीवार हे दोघे दुकानात भागीदार आहेत. मुनीवर व अब्दुल हे काका-पुतणे आहेत. अब्दुल व तय्यब दोघे दुकानाचे काम पाहतात. दुकानात एकूण चार कामगार असून, एकजण अर्धवेळ काम करतो. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला शहानू भावाला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. हे दुकान 260 चौरस फुटांचे असून, त्याला पोटमाळा आहे. तेथेच बेकरीचे साहित्य बनवले जाते. कामगार दिवसभर काम केल्यानंतर पोटमाळ्यावरच झोपतात. दुकानात अग्निप्रतिरोधक यंत्रणा होती. त्याचे दोन फायर ठेवण्यात आलेले होते.

अब्दुल चिन्नीवार रात्री अकराला दुकान बंद केल्यानंतर दुकानाला बाहेरुन कुलूप लावून जातात. कुलुपाची एक चावी कामगारांकडे असते. दुकानाला दोन शटर आहेत. एक बाहेरुन व दुसरे आतून लावलेले असते. दुकानातून बाहेर पडण्यासाठी एकच वाट आहे, तर दुकानावर सोसायची आहे.

शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुकानात अचानक आग लागली. दुकानात फर्निचर व बेकरीचे साहित्य असल्याने मोठ्या प्रमाणात धूर झाला. हा धूर दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटपर्यंत गेला. तेेथील रहिवाशांनी धूर कुठून येत आहे हे पाहिले असता, दुकानात आग लागल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. कोंढवा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. रहिवाशांनी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अब्दुल चिन्नीवार यांनी प्रथम शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शटर वर घेताच, धुराचे लोळ बाहेर आल्यानेे त्यांना शटर उघडता आले नाही.

अग्निशामक दलाच्या जवानांनी शटर उघडले. पाण्याच्या फवार्‍यांने आग नियत्रंणात आणली. धुराचे लोळ कमी झाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी दुकानात प्रवेश केला असता, सहाही कामगारांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाल्याचे आढळून आले. पहाटे साडे सहाच्या सुमारास या सर्वांचे मृतदेह ससूनमध्ये पाठवण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी बेकरीमालकांसह तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.