पुण्यात कामावरून काढल्याने महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

पुणे : 32 वर्षीय महिलेने दुकानातून कमी केल्याचा राग कामगाराला अनावर झाल्यानंतर त्याने महिलेला जिवंत जाळले व या घटनेत महिलेनेदेखील संशयीतास पकडून ठेवल्याने तोदेखील होरपळल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी परीसरात सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. मिलिंद गोविंदराव नाथसागर (35, रा.वडगावशेरी, पुणे. मू.रा. परभणी) आणि बाला नोया जॅनिंग (32, रा.वडगावशेरी, पुणे. मू.रा. ओडिशा) अशी दोन्ही मयतांची नावे आहेत. या घटनेत नाथसागरचा मित्र प्रशांतकुमार सुशांतकुमार देबनार (32) हा सुमारे 35 टक्के भाजला आहे. याप्रकरणी बाला जॅनिंग या महिलेने मृत्यूपूर्वी ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत चंदननगर पोलिसांकडे जबाब दिला आहे.

कामावरून काढल्याचा राग अनावर
बाला जॅनिंग ही महिला मूळची ओडिशाची रहिवासी असून तिची सध्या घटस्फोट केस सुरू होती. तिला 12 वर्षांची मुलगी असून ती गावीच राहते तर आठ वर्षांच्या मुलासह ती पुण्यात राहते. आठ वर्षांपूर्वी टेलरींगच्या कामानिमित्ताने ती पुण्यात आली आणि स्थायिक झाली. वडगावशेरीतील पोलिस लायनीत तिचे ‘ए टु झेड’ नावाने लेडीज टेलरिंगचे दुकान आहे. दोन वर्षांपासून त्यांच्याकडे आरोपी मिलिंद नाथसागर दुकानात कामाला होता. आरोपी व्यवस्थित काम करीत नसल्याने जोर्निंग यांनी आठ दिवसांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे आरोपी महिलेवर चिडला.

पेट्रोल टाकून महिलेला जाळले
सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास महिला दुकानाचे अर्धे शटर बंद करून टेलरिंगचे काम करीत असताना आरोपी पेट्रोलने भरलेला कॅन घेऊन दुकानात शिरला. षमला कामावरून काढून टाकले, आता तुला जिवंत सोडणार नाही,’ असे धमकावून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकले. या दरम्यान दोघांमध्ये झटापट झाल्याने आरोपीच्या अंगावरही पेट्रोल उडाले. आरोपीने लायटरने महिलेला पेटवले. दुकानात पेट्रोल उडल्याने आरोपीदेखील आगीत होरपळला. सोमवारी रात्रीच आरोपी नाथसागरचा मृत्यू झाला.