पुण्यातील शुक्रवार पेठे धुमसला

0

पुणे। शुक्रवार पेठेतील 60 वर्षे जुन्या तीन मजली इमारतीला बुधवारी अचानक आग लागली. या आगीवर नियत्रंण मिळवताना शेजारी असणार्‍या वाड्याची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. तर, अग्निशामक दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि 40 ते 50 जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण आगीत संपुर्ण वाडा बेचीराख झाला असून, शेजारी असणार्‍या वाड्यांनाही त्याची धग पोहचली आहे. हे वाडे पाडण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.

प्रविण द्वारकादास बन्सल (वय 42, रा. येरवडा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, महेश तुकाराम गारगोटे (वय 42), निलेश विठ्ठल कर्णे (वय 33), सचिन बाबू जोंजाळे (वय 36) आणि जितेंद्र रमेश सपाटे (वय 30) अशी जखमी जवानांची नावे आहेत. भोळी आळीत हरिहर देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा हा वाडा असून, तो 50 ते 60 वर्षे जुना आहे. तो पुर्ण लाकडी आहे. अनेक वर्षापासून येथे कोणीच राहत नव्हते. या वाड्यात सुरेंद्र बन्सल यांचे अग्रवाल अँन्ड सन्स हे स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे दुकान आहे. पहाटे 3.30 वाजता या वाड्याच्या छपरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे पाहताच नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारणा केली. काही वेळातच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप घेतले होते. आग मोठी असल्याने इतर फायर गाड्यांना बोलवण्यात आले. एका वाड्यामध्ये आग पसरल्याने तो कोसळण्याची भीती अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली. आगीचे कारण अद्याप समजण्यात आलेले नाही.

फटाक्यांचा आवाज, धूर अन रहिवाशांचा गोंधळ
आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. नागरिकांनी तत्काळ लहान मुलांना घेऊन सुरक्षितस्थळी धाव घेतली. अग्रवाल अँड सन्स दुकानात फटाके ठेवण्यात आलेले होते. आग लागताच फटाके फुटण्यास सुरुवात झाली. फटाक्यांच्या आवाजाने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अग्निशामक जवान आणि पोलिसांनी मोठी कसरत करावी लागली.