पुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल

पुणे : पुण्यातील महिला पोलीस उपायुक्त यांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी मागत असल्याचं ऐकायला मिळत आहे. पुणे पोलीस दलात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिप?

पोलीस उपायुक्त असणाऱ्या या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती सांगत कुठे अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, कोल्हापूरची मटण थाली असं सांगतो. यावर महिला अधिकरी जास्त चांगली कुठे आहे असं विचारल्यानंतर कर्मचारी त्यांना साजूक तुपातली, त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे असं सांगतो. तसंच ऑईली बिलकूल नाही आणि साजूक तुपातली पण चांगली आहे. कलर वगैरे नसतं त्यात असंही सांगतो. यावर महिला अधिकारी बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे. जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्या मॅडमनं सांगितलं म्हणून. मी बोलू का पीआयला असं विचारतात. यावर कर्मचारी नाही मॅडम करतो मी असं सांगतो. “त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण?,” अशी विचारणा महिला अधिकारी करते. “आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो,” असं पोलीस कर्मचारी सांगतो. यावर महिला अधिकारी मग तुम्ही काय करायचे? असं विचारतात. त्यावर पोलीस कर्मचारी आपण कॅशच करायचो मॅडम असं सांगतो. “तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं? नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते,” असं महिला अधिकारी यावेळी त्या कर्मचाऱ्याला सांगते. यानंतर पोलीस कर्मचारी येस मॅडम. मी सांगतो असं उत्तर देतो. ऑडिओ क्लिपच्या शेवटी महिला अधिकारी म्हणतात की, “त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही”.

चौकशीचे आदेश

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, पोलीस उपायुक्त यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितला असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,” असं दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. या प्रकरणी संबंधित पोलीस उपायुक्तांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे एक षडयंत्र असून ऑडिओ एडिट केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Copy