पुण्यातल्या तिसर्‍या मेट्रोला शासनाचा हिरवा कंदिल

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत राज्यशासनाने पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडे, या तिसर्‍या मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला आहे. सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत शिवाजीनगर-हिंजवडे (बाणेर मार्गे) मेट्रोला परवानगी देण्यात आल्याचे पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

साडेसात हजार कोटी खर्च
साधारण 31 किलोमीटर लांबीच्या या मेट्रोवर 23 ते 25 स्थानके असतील. दर अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर हे स्थानक असेल. प्रत्येक स्थानक सहा डबे क्षमतेचे असेल. यासाठी 31 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाला साधारण साडेसात हजार कोटी रूपये लागणार आहेत. त्यातील 20 टक्के केंद्र सरकार, 20 टक्के राज्य सरकार, 10 टक्के भाग पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरण उचलणार आहे.

‘सनबर्न’ला खतपाणी नाही
सनबर्नच्या चार दिवसांच्या पुण्यातल्या कार्यक्रमाला न्यायालयाने परवानगी दिली असली तरी पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारे कोणतेही कृत्य तेथे होऊ देणार नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच स्थानिक जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध प्रकारची पथके तैनात असतील. अंमली पदार्थांचा वापर अथवा इतर बेकायदेशीर कृत्य झाल्यास संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल केले जातील. आपण अशा संस्कृतीला खतपाणी घालणार नसल्याचे बापट यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.